बेळगाव लाईव्ह : राजहंसगड येथील संघामार्फत चालवल्या जाणाऱ्या स्वस्त धान्य दुकानाच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत तीव्र आंदोलन छेडले. अध्यक्षासह एका बोगस सेक्रेटरीने कोणालाही विश्वासात न घेता गैरव्यवहार करत शासनाचे कमिशन हडपल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजहंसगड येथे ‘राजहंसगड ग्रामाभिवृद्धी हागु विविध उद्देश संघ’ या नावाने रेशन वाटप केले जाते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या संघाचे नूतनीकरण झालेले नाही. गावात वादविवाद असल्याने नूतनीकरण रखडले असताना, अध्यक्ष भाऊराव पवार यांनी कोणालाही न कळवता एका बोगस सेक्रेटरीची नियुक्ती केली. या दोघांनी संगनमत करून शासनाकडून मिळणारे सर्व कमिशन परस्पर लाटल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. संशय आल्याने सदस्यांनी बँकेत चौकशी केली असता, खात्यावरून एक लाख तीन हजार रुपये काढण्यात आल्याचे उघडकीस आले.
याशिवाय, शासनाकडून मोफत असणाऱ्या ईकेवायसीच्या प्रक्रियेसाठी प्रत्येक लाभार्थ्याकडून ५० रुपये उकळले जात असल्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत असून त्यांना वेळेवर धान्यही मिळत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत.

प्रकरणाची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी दुकानाची पाहणी केली असता अनेक अनियमितता आढळून आल्या. या वेळी संतप्त गावकऱ्यांनी अध्यक्षांच्या घरी जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र अध्यक्ष भाऊराव पवार यांनी तेथून काढता पाय घेतला.
या वेळी ग्रामस्थांनी काही काळ अधिकाऱ्यांना रोखून धरले होते. दोषी अध्यक्ष व बोगस सेक्रेटरीची हकालपट्टी करावी, दुकानाचा परवाना रद्द करून नवीन समितीकडे कारभार सोपवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही महिला व ग्रामस्थांनी दिला आहे.





