belgaum

एपीएमसी मार्केटवर उपलोकायुक्तांची अचानक धाड

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत चालणारा कारभार, शेतकऱ्यांची होणारी फसवणूक आणि मूलभूत सुविधांची झालेली दुरवस्था या पार्श्वभूमीवर उपलोकायुक्त न्यायमूर्ती बी. वीरप्पा यांनी आज सकाळी अचानक भेट देऊन पाहणी केली. या कारवाईमुळे एपीएमसी प्रशासन, व्यापारी आणि दलालांचे धाबे दणाणले असून संपूर्ण बाजारात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पाहणीदरम्यान उपलोकायुक्तांनी थेट भाजी मार्केटमधील वजनकाट्यांची तपासणी केली. या वेळी वजनात तफावत आढळल्याने तसेच घाऊक व्यापाऱ्यांकडून विक्रीच्या पावत्या दिल्या जात नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रत्यक्ष व्यापाऱ्यांकडे आणि दलालांकडे चौकशी करून शेतकऱ्यांकडून नेमके किती टक्के कमिशन वसूल केले जाते, याची माहिती त्यांनी घेतली. शेतकऱ्यांची लूट करून अधिक कमिशन उकळणाऱ्या व्यापारी व दलालांचे परवाने रद्द करण्याचे स्पष्ट कायदेशीर अधिकार प्रशासनाला आहेत, असा इशारा देत दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यासोबतच रात्रीच्या वेळी माल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या विश्रांतीची कोणतीही व्यवस्था नसणे, पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प बंद असणे आणि स्वच्छतागृहांची झालेली दुरवस्था यावर उपलोकायुक्तांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

 belgaum

बाजारातील उपहारगृहाची अवस्था कचराकुंडीसारखी झाल्याबद्दल त्यांनी सचिवांकडून थेट उत्तर मागितले. शेतकरी आणि हमालांसाठी विश्रांतीगृह तसेच वाहनतळाची पुरेशी व्यवस्था का नाही, याबाबतही त्यांनी कडक जाब विचारला.

एपीएमसीत राबणाऱ्या हमालांना आणि कामगारांना आवश्यक शासकीय सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारींवरून त्यांनी कामगार विभागाला तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले. पुढील दोन दिवसांत सर्व दुकानांमधील कामगारांची संपूर्ण माहिती गोळा करून पात्र कामगारांना सर्व शासकीय योजना आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. यानंतर त्यांनी शेतकरी भवनालाही भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.

या धाडीदरम्यान लोकायुक्त पोलीस अधीक्षक प्रसन्न देसाई, उपनिबंधक अरविंद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव के. एन. शिवकुमार, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, उपविभागीय अधिकारी श्रवणकुमार नायक, महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांच्यासह विविध संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.