belgaum

जिल्हा रुग्णालयावर उपलोकायुक्तांची अचानक धाड

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या जिल्हा रुग्णालयातील ढिसाळ कारभार, औषध साठ्यातील अनागोंदी आणि वैद्यकीय सेवांमधील त्रुटींची गंभीर दखल घेत राज्याचे उपलोकायुक्त न्यायमूर्ती बी. वीरप्पा यांनी गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी रुग्णालयाला अचानक भेट देऊन झाडाझडती घेतली.

तपासणीदरम्यान रुग्णालयाच्या औषधांच्या गोदामांची पाहणी केली असता, रेबीजसह विविध गंभीर आजारांवरील लाखो रुपयांच्या कालबाह्य लसी आणि औषधांचा साठा आढळून आला. यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत उपलोकायुक्तांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करत सविस्तर अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), नोंदणी काउंटर आणि औषध वितरण केंद्रांसमोर लागणाऱ्या रुग्णांच्या लांबच लांब रांगा व गर्दी पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. रुग्णांच्या सोयीसाठी काउंटरची संख्या तात्काळ वाढवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, रुग्णालयात मोफत उपलब्ध असतानाही बाहेरून औषधे खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना गरीब रुग्णांवर आर्थिक भार न टाकण्याची सक्त ताकीद देण्यात आली.

 belgaum

या पाहणीत रुग्णालयातील काही भागांत अस्वच्छता असल्याचे आणि जखमांच्या ड्रेसिंगची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी संबंधित डॉक्टरांना जाब विचारला. याशिवाय, आंतररुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग आणि प्रसूती विभागाला भेट देऊन त्यांनी रुग्णांशी थेट संवाद साधला व त्यांच्याकडून उपचाराबद्दल माहिती घेतली.

यावेळी लोकायुक्त पोलीस अधीक्षक प्रसन्न देसाई, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, बिम्सचे संचालक विनय दास्तीकोप्प, जिल्हा आरोग्य व कुटुंबकल्याण अधिकारी डॉ. आय. पी. गडाद, उपनिबंधक अरविंद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव के. एन. शिवकुमार, जिल्हा पंचायत योजनेचे संचालक रवी बंगारप्पनवर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.