बेळगाव लाईव्ह : सराफ गल्ली परिसरातील रस्त्याची गेल्या २० वर्षांपासून दुरवस्था असून, अद्याप रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही, असा आरोप श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी केला. नागरिकांकडून घर टॅक्स, नळ टॅक्स आणि रोड टॅक्स घेतला जात असताना विकासकामांमध्ये दुजाभाव का केला जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महापुरुषांच्या निमित्ताने सराफ गल्ली परिसरात गेल्यानंतर तेथील रस्त्याची परिस्थिती पाहिली. गेल्या दोन दशकांपासून या रस्त्याचे काम झाले नसल्याचे कोंडुस्कर यांनी सांगितले. “इथं राहणारे माझे बांधव काय पाकिस्तानमधले आहेत काय? ते घर टॅक्स, नळ टॅक्स, रोड टॅक्स भरत नाहीत काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जनतेकडून कराच्या माध्यमातून मिळणारा पैसा हा जनतेचाच असून, कोणताही लोकप्रतिनिधी स्वतःची मालमत्ता विकून विकासासाठी निधी आणत नाही, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे “माझा फंड, माझा फंड” असे म्हणण्याऐवजी जनतेच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांचा समान पद्धतीने विचार केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
बेळगाव परिसरातील अनेक रस्ते विकासाच्या नावाखाली खड्डेमय झाल्याचा आरोप करत, सराफ गल्लीतील रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्याची मागणी त्यांनी केली. रस्त्यासाठी निधी कोणत्याही मार्गाने उपलब्ध झाला तरी चालेल; मात्र रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे, असे कोंडुस्कर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, “मते दिली नाहीत म्हणून रस्ता करणार नाही” अशा प्रकारची भूमिका लोकप्रतिनिधींनी घेऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला. नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास बेळगावकरांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत आपण गप्प बसणार नसल्याचे कोंडुस्कर यांनी सांगितले.
आंदोलनाचा इशारा
सराफ गल्लीतील रस्त्याचे काम लवकर सुरू न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा रमाकांत कोंडुस्कर यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी यावर काय भूमिका घेतात, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.





