बेळगाव लाईव्ह: सौंदत्ती तालुक्यातील प्रसिद्ध यल्लम्मागुड्डा येथे हॉटेल्स, खाद्यपदार्थांची दुकाने आणि किराणा दुकानांवर करण्यात आलेल्या तपासणीत अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे अनेक उल्लंघन उघडकीस आले आहेत. रविवारी श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिर विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी कुजलेल्या भाज्यांचा वापर, मुदतबाह्य औषधांची विक्री तसेच उत्पादन आणि मुदत समाप्तीची माहिती नसलेले खाद्यपदार्थ व शीतपेयांचा साठा आढळून आला.
प्राधिकरणाच्या सचिव प्रभावती फकीरपूर यांच्या नेतृत्वाखाली विविध भागांतील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, शीतपेय विक्री केंद्रे आणि किराणा दुकानांची तपासणी करण्यात आली. यावेळी काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी कुजलेल्या भाज्या आणि आंबवलेले धान्य वापरले जात असल्याचे आढळले. काही आस्थापनांमध्ये अस्वच्छ परिस्थितीत व्यवसाय सुरू असल्याचेही निदर्शनास आले.
परवाना नसलेल्या किंवा मुदत संपलेल्या परवान्यांवर व्यवसाय करणाऱ्या हॉटेलचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच, अनेक दुकानांमध्ये उत्पादनाची तारीख आणि मुदत समाप्तीची माहिती नसलेली शीतपेयांची बाटली व खाद्यपदार्थांची पाकिटे विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले.
पूजा साहित्याच्या दुकानांतून औषधांची विक्री
यल्लम्मागुड्डा येथील काही कुंकू, भंडारा आणि किराणा दुकानांमध्ये परवानगीशिवाय औषधे व गोळ्यांचा साठा करून विक्री केली जात असल्याचे तपासणीत समोर आले. परिसरात कायमस्वरूपी दवाखाने किंवा औषधांची दुकाने नसल्याने भाविकांना उपचारासाठी जवळच्या गावांमध्ये जावे लागत असल्याची माहिती उगारगोळ गावातील भाविक मल्लणगौडा पाटील यांनी दिली.
मोठ्या यात्रा आणि उत्सवांच्या काळात सरकारी रुग्णालयांकडून तात्पुरती वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जातात. मात्र, भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी वैद्यकीय सुविधा उपलब्ध असण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
अनधिकृत बांधकामे आणि अस्वच्छ साठवणुकीवरही कारवाई
काही व्यापाऱ्यांनी परवानगी न घेता स्वच्छतागृहे आणि स्नानगृहे बांधल्याचे आढळून आले. तसेच, भाज्यांची अस्वच्छ ठिकाणी साठवणूक केली जात असल्याचेही तपासणीत समोर आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही आस्थापनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचे नियम पाळले नाहीत, तर संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले जाऊ शकतात, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
आगामी यात्रांच्या पार्श्वभूमीवर नियमित तपासणी
नवरात्रोत्सव, बनदा हळ्ळीमे आणि भारत हळ्ळीमे यात्रांच्या पार्श्वभूमीवर यल्लम्मागुड्डा येथे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. लाखो भाविकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमित तपासणी सुरूच राहणार असल्याचे प्रभावती फकीरपूर यांनी सांगितले.
भाविकांनी खाद्यपदार्थ, औषधे आणि इतर वस्तू खरेदी करताना उत्पादनाची तारीख, मुदत समाप्ती आणि विक्रीची अधिकृतता तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.





