बेळगाव लाईव्ह : गणेश मंडळांनी एकजुटीने काम करून समाजात बंधुभाव, सद्भावना आणि अखंडता कायम ठेवावी, असे आवाहन दिल्ली येथील बाबा कालिदास महाराजांनी केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकीची ताकद वाढवून समाजाला प्रगतीच्या दिशेने नेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगावातील खडक गल्ली येथील ‘बेळगावचा मानाचा राजा’ गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर बाबा कालिदास महाराज बोलत होते. यावेळी त्यांनी खडक गल्लीच्या गणपतीला सिद्धपीठ आणि सिद्धस्थळ संबोधत गणरायाची स्तुती केली.
खडक गल्लीच्या गणपतीची ७८ वर्षांची परंपरा असल्याचा उल्लेख करत महाराजांनी या ठिकाणी भक्तांची मोठी श्रद्धा असल्याचे सांगितले. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आध्यात्मिक अनुभूती मिळाल्याचे नमूद करत, मुंबईतील लालबागच्या राजाप्रमाणेच खडक गल्लीच्या गणपतीमध्येही आध्यात्मिक ऊर्जा असल्याचे त्यांनी म्हटले.
गणेश मंडळे आणि तरुणांना संदेश देताना बाबा कालिदास महाराजांनी संघटित होऊन कार्य करण्यावर भर दिला. अहिंसा, सद्भावना आणि सत्कर्माच्या मार्गावर राहून सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास समाज अधिक मजबूत होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

बेळगावातील गणेशोत्सवाची परंपरा पुढे नेताना यापूर्वीपेक्षा अधिक उत्साहाने आणि प्रगतीच्या दिशेने उत्सव साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी बेळगावातील गणेशोत्सवाचा ऐतिहासिक संदर्भ, पुण्यानंतर बेळगावात गणेशोत्सवाच्या सुरुवातीची परंपरा आणि शहरातील गणेश मंडळांची संख्या याबाबत चर्चा झाली.
याप्रसंगी माजी आमदार अनिल बेनके, विश्वजीत चौगुले संजय जाधव विजय जाधव यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





