बेळगाव लाईव्ह : काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२.९२ ग्रॅम हेरोईन बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नागेश मधूकर भगत (वय ३५, रा. सध्या देशपांडे गल्ली, सुळगा – उच्च) याला बेळगावच्या दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
सीसीबी आणि काकती पोलिसांनी १९ एप्रिल २०२६ रोजी कारवाई करत आरोपीकडून १२.९२ ग्रॅम हेरोईन पावडर जप्त केली होती.
तेव्हापासून आरोपी हिंडलगा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. या प्रकरणी काकती पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल झाल्याने आरोपीच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायाधीश गंगाधर के. एन. यांनी १ लाख रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र आणि तितक्याच रकमेचे दोन जामीनदार,
साक्षीदारांना न धमकावणे, पुन्हा असा गुन्हा न करणे व प्रत्येक सुनावणीला न्यायालयात हजर राहणे या अटींवर जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने ॲड. एम. जी. कामाण्णाचे यांनी काम पाहिले.





