बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम तसेच शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते नितीन बानूगडे पाटील यांची २००६ मधील खानापूर युवा महामेळावा प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
खानापूर येथील जेएमएफसी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. तत्कालीन तपास अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या साक्षींमध्ये तफावत आढळून आली. तसेच आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले फोटो आणि व्हिडिओ पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात सरकारी पक्षाला यश आले नाही. त्यामुळे पुराव्याअभावी न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
२००६ मधील युवा महामेळावा प्रकरण
२६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापूर येथील तारा राणी हायस्कूलच्या मैदानावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने युवा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बेळगावमध्ये होणाऱ्या सुवर्णसौध अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
या मेळाव्यात रामदास कदम आणि नितीन बानूगडे पाटील यांनी केलेल्या भाषणांमुळे कन्नड-मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण झाली आणि जमावाला चिथावणी मिळाली, असा पोलिसांचा आरोप होता.
या प्रकरणी २७ ऑक्टोबर २००६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या युवकांच्या मेळाव्यास रामदास कदम** (तत्कालीन विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र राज्य) नितीन बानूगडे पाटील (सातारा),हसन मुश्रीफ (महाराष्ट्र राज्याचे मंत्री)रामभाऊ चव्हाण (तत्कालीन कोल्हापूर शिवसेना अध्यक्ष)
गोपाळराव मयेकर (गोव्याचे माजी मंत्री) दिगंबर पाटील माजी आमदार खानापूर हे उपस्थित होते.
पोलिसांकडून गंभीर आरोप
पोलिसांच्या आरोपानुसार, मेळाव्यानंतर जमावाने कन्नड भाषिक फलक, होर्डिंग्ज, कर्नाटक राज्य परिवहनच्या बसेस तसेच काही हॉटेल्सवर दगडफेक आणि तोडफोड केली. जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचाही आरोप करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर रामदास कदम आणि नितीन बानूगडे पाटील यांच्यावर प्रक्षोभक भाषणे करून परिस्थिती चिघळवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

न्यायालयात पुरावे ठोस ठरले नाहीत
खटल्याच्या सुनावणीदरम्यान तीन प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांच्या साक्षींमध्ये तफावत असल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
तसेच मेळाव्याचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी फोटोग्राफर नेमल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र सुनावणीदरम्यान संबंधित फोटो किंवा व्हिडिओ पुरावा न्यायालयात सादर करण्यात आला नाही.
त्यामुळे आरोपींनी प्रक्षोभक भाषणे केली आणि त्यातून दंगल किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, हे सरकारी पक्षाला ठोस पुराव्यांच्या आधारे सिद्ध करता आले नाही.
बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य
रामदास कदम आणि नितीन बानूगडे पाटील यांच्यावतीने फौजदारी वकील ॲड. श्यामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नवर आणि ॲड. जोतिबा पाटील यांनी कायदेशीर बाजू मांडली. बचाव पक्षाने मांडलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.
सबळ आणि ठोस पुराव्याअभावी खानापूर न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे
- घटना : २६ ऑक्टोबर २००६
- गुन्हा दाखल : २७ ऑक्टोबर २००६
- ठिकाण : तारा राणी हायस्कूल मैदान, खानापूर
- प्रकरण : महाराष्ट्र एकीकरण समिती युवा महामेळावा
- न्यायालय : खानापूर जेएमएफसी न्यायालय
- निर्णय : रामदास कदम आणि नितीन बानूगडे पाटील निर्दोष मुक्त
- मुख्य कारण : साक्षींमध्ये तफावत आणि ठोस फोटो-व्हिडिओ पुराव्यांचा अभाव
- बचाव पक्ष : ॲड. श्यामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नवर, ॲड. जोतिबा पाटील





