belgaum

‘कान फुटण्याचा’ त्रास वाढतोय! काय काळजी घ्याल?

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : पावसाळ्यात सर्दी, घसा दुखणे, नाक चोंदणे आणि कान बंद होण्याच्या तक्रारी वाढतात. यामध्ये काही रुग्णांना कानातून पाणी किंवा पू येण्याचा त्रास होतो. सामान्य भाषेत याला ‘कान फुटणे’ असे म्हटले जाते. लहान मुलांमध्ये हा त्रास तुलनेने अधिक दिसून येतो, तर मध्यमवयीन व्यक्तींमध्येही तो आढळतो. हा त्रास नेमका का होतो आणि त्यावर होमिओपॅथीमध्ये कोणते उपचार उपलब्ध आहेत, याबाबत डॉ. सोनाली सरनोबत यांनी ‘बेळगाव लाईव्ह’च्या हेल्थ टिप्स या मालिकेत माहिती दिली.

डॉ. सरनोबत यांच्या मते, घसा, नाक आणि कानामध्ये वारंवार होणारा संसर्ग हे कानातून पाणी किंवा पू येण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक आहे. सर्दी, फ्लू, ताप, घशात कफ किंवा नाक चोंदणे यामुळे घसा आणि मध्य कानाला जोडणारी युस्टेशियन ट्यूब बंद होऊ शकते. त्यामुळे मध्य कानामध्ये संसर्ग होऊन ओटायटिस मीडिया होण्याची शक्यता असते.

मध्य कानामध्ये संसर्ग झाल्यानंतर तेथे दाब वाढल्यास कानाच्या पडद्यावर परिणाम होऊ शकतो. काही वेळा कानातून पाणी, पू किंवा क्वचित रक्तस्रावही होऊ शकतो. वारंवार असा त्रास झाल्यास कानाच्या पडद्याला छिद्र पडण्यासह ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो, असा इशारा डॉ. सरनोबत यांनी दिला.

 belgaum

कानात तेल किंवा इअरबड्स वापरणे टाळा

कानातून पाणी किंवा पू येऊ लागल्यास काहीजण स्वतःहून कानात तेल घालतात किंवा इअरबड्सच्या साहाय्याने कान साफ करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशा प्रकारे स्वतः उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सायनसचा तीव्र संसर्ग असल्यास त्याचाही कानावर परिणाम होऊ शकतो. सायनसमध्ये साचलेल्या कफामुळे युस्टेशियन ट्यूबवर परिणाम होऊन मध्य कानातील दाब आणि संसर्ग वाढू शकतो.

सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

घसा दुखणे, सर्दी, नाक चोंदणे किंवा कान बंद होणे अशी सुरुवातीची लक्षणे दिसताच योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. संसर्ग वारंवार होत राहिल्यास ‘कान फुटण्याचा’ त्रासही पुन्हा पुन्हा होऊ शकतो आणि त्याचा परिणाम ऐकण्याच्या क्षमतेवर होण्याची शक्यता असते.

पावसाळ्यात तसेच दुचाकीवरून प्रवास करताना कान आणि नाक-घशाचे थंड वाऱ्यापासून संरक्षण करावे. हेल्मेटचा वापर करावा. कानात काडी, इअरबड्स किंवा तेल घालणे टाळावे, असा सल्ला डॉ. सरनोबत यांनी दिला.

कानाशी संबंधित कोणताही त्रास झाल्यास स्वतःहून औषधोपचार न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. होमिओपॅथिक उपचारांसह कोणतीही औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि योग्य मात्रेतच घ्यावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ सोनाली सरनोबत ( होमिओपॅथी तज्ञ बेळगाव)

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.