बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप सोमवारपर्यंत अंतिम होण्याची शक्यता असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
बेंगळुरूमध्ये शनिवारी पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले की, मंत्रिमंडळात अनुभवी तसेच प्रशासनाचा चांगला अनुभव असलेले मंत्री आहेत. त्यामुळे खातेवाटपाच्या मुद्द्यावर कोणतीही मोठी अडचण निर्माण होणार नाही. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आज किंवा उद्यापर्यंत याबाबत निर्णय घेण्याची शक्यता असून, सोमवारपर्यंत मंत्र्यांना खाती वाटप केली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
मंत्र्यांना डच्चू देण्याबाबत माहिती नाही
मंत्रिमंडळातून काही मंत्र्यांना वगळण्याच्या चर्चेबाबत बोलताना जारकीहोळी म्हणाले की, याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही. या विषयावर यापूर्वीच अनेकांनी भाष्य केले आहे. एआयसीसीचे कर्नाटक प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे.
नाराज असलेल्या नेत्यांच्या घरी मुख्यमंत्री गेले आहेत. केपीसीसी अध्यक्षांनीही त्यांची भेट घेतली आहे. इतर मंत्र्यांनीही त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे निर्माण झालेला गोंधळ दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
महिलांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळावे
बसवराज शिवण्णवर यांना मंत्रिपद न मिळाल्याने निर्माण झालेल्या नाराजीबाबतही जारकीहोळी यांनी भाष्य केले. पक्षाचे वरिष्ठ नेते हा प्रश्न सोडवतील. प्रत्येक बाबीसाठी काही वेळ द्यावा लागतो, असे त्यांनी सांगितले.
तसेच, कोणतेही सरकार असले तरी किमान एका महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. महिलांना मंत्रिमंडळात योग्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
बसवराज होरट्टी यांच्या राजीनाम्यावर भाष्य
विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी यांना धमकी देऊन राजीनामा देण्यास भाग पाडल्याच्या आरोपांबाबत विचारले असता जारकीहोळी म्हणाले की, होरट्टी यांनी स्वतः राजीनामा दिला आहे. ते ज्येष्ठ नेते असून, ‘मी स्वतः राजीनामा दिला,’ असे त्यांनीच सांगितले आहे. आपणही हे माध्यमांमधून पाहिले असल्याचे जारकीहोळी म्हणाले.
ज्येष्ठ राजकारण्याला धमकी देण्याचा हा काळ नाही. त्यामुळे या प्रकरणाला वेगळा अर्थ देण्याची गरज नसून हा विषय आता संपला आहे. पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.





