belgaum

२०२८ नंतर भाजपची अवस्था आणखी बिकट होईल’; लक्ष्मण सवदींचा दावा

0
Laxman savadi
Laxman savadi
 belgaum

बेळगाव लाईव्ह :काँग्रेस सरकार अस्थिर असल्याचा आरोप करणाऱ्या भाजपवर आमदार लक्ष्मण सवदी यांनी जोरदार पलटवार केला. सत्ताधारी पक्षावर टीका करण्यापेक्षा विरोधकांनी जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन अधिवेशनात ते मांडणे अपेक्षित आहे. मात्र, विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका पार पाडण्याऐवजी भाजपचे नेते काय करत आहेत, असा सवाल सवदी यांनी उपस्थित केला.

बेळगाव मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सवदी म्हणाले की, भाजपच्या नेत्यांना राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सरकारविरोधात सातत्याने वक्तव्ये करावी लागत आहेत. आगामी २०२८ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधकांनी अतिवृष्टी आणि दुष्काळाचा फटका बसलेल्या भागांचा दौरा करून तेथील परिस्थितीची माहिती घ्यावी आणि विधानसभेच्या अधिवेशनात संबंधित प्रश्न प्रभावीपणे मांडावेत, अशी अपेक्षाही सवदी यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षाचे काम हे केवळ सरकारवर आरोप करणे नसून जनतेच्या अडचणी सभागृहात मांडणे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 belgaum

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या सूचनेनुसार २०२८ मध्ये पुन्हा काँग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी आपण काम करत असल्याचेही सवदी यांनी सांगितले. मंत्रिपद किंवा खाते कोणते मिळते यापेक्षा मिळालेली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

महिला मंत्र्यांच्या नियुक्तीबाबत पक्षात विचारविनिमय सुरू असल्याचेही सवदी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी अहवाल आगामी मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी सवदी यांनी मतदारांचे आभार मानत, जनतेच्या विश्वासाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तसेच अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांकडून सत्कार स्वीकारल्यानंतर सन्मानाने पदाचा राजीनामा दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.