बेळगाव लाईव्ह : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचा आरोप करत कॅन्टोन्मेंट रहिवासी संघटनेच्या वतीने माजी आमदार अनिल बेनके यांना निवेदन देण्यात आले.
कॅन्टोन्मेंट हद्दीतून जाणारे तीन रस्ते बंद करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. या निर्णयामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार, शेतकरी, व्यावसायिक, रिक्षाचालक तसेच दररोज या मार्गांचा वापर करणाऱ्या हजारो नागरिकांना लांबचा वळसा घ्यावा लागणार आहे. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च वाढणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच आणखी दोन रस्त्यांवर उंची प्रतिबंधक बॅरिअर्स बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे बॅरिअर्स वाहतुकीसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यावर वाहने आदळून अपघात होण्याची शक्यता असून, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे.
दरम्यान, कॅन्टोन्मेंट रहिवासी संघटनेच्या शिष्टमंडळासह माजी आमदार अनिल बेनके यांनी विद्यमान खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेतली. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची माहिती देत हे निर्णय तातडीने पुनर्विचारात घेण्याची मागणी खासदार शेट्टर यांच्याकडे करण्यात आली.

कॅन्टोन्मेंटमधील हे रस्ते आपत्कालीन परिस्थितीत तसेच व्हीआयपी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणूनही महत्त्वाचे आहेत. सध्या या मार्गांवर नियमित वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने रस्ते बंद केल्यास शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाने या संदर्भात सार्वजनिक नोटीस जारी केली असून, नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीवर आणि शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या विषयात तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.





