खानापूर : गेल्या २५ ते ३० वर्षांपासून मतदानासाठी भुत्तेवाडी येथील मतदान केंद्रावर जावे लागणाऱ्या चन्नेवाडी गावकऱ्यांची गैरसोय अखेर दूर झाली आहे. चन्नेवाडी गावासाठी स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर करण्यात आले असून, आता गावकऱ्यांना गावातील प्राथमिक शाळेतच मतदान करता येणार आहे.
चन्नेवाडी, ता. खानापूर येथील नागरिकांना मतदानासाठी भुत्तेवाडी येथे जावे लागत असल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि इतर मतदारांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत गावकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी खानापूरचे तहसीलदार धुंडाप्पा कोमार यांच्याकडे निवेदन देत चन्नेवाडीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र तसेच स्वतंत्र वॉर्डाची मागणी केली होती.
या मागणीचा पाठपुरावा चन्नेवाडीचे रहिवासी, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष आणि सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनीही केला. त्यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन स्वतंत्र मतदान केंद्र व वॉर्डाबाबत निवेदन सादर केले होते.
त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील महिन्यात चन्नेवाडीसाठी स्वतंत्र बूथ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. दिलेले आश्वासन पूर्ण करत जिल्हाधिकाऱ्यांनी आता चन्नेवाडी गावासाठी 196A क्रमांकाचे स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर केले आहे.
यापुढील निवडणुकांमध्ये चन्नेवाडी गावातील मतदारांना गावातील प्राथमिक शाळेतच मतदान करता येणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासूनची गावकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे.

स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर झाल्यानंतर गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यासाठी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, खानापूर तालुक्याचे निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण आणि तहसीलदार धुंडाप्पा कोमार यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, स्वतंत्र मतदान केंद्रासोबतच चन्नेवाडी गावासाठी स्वतंत्र वॉर्डाची मागणीही गावकऱ्यांनी केली असून, या मागणीचाही पाठपुरावा सुरू आहे.





