बेळगाव लाईव्ह :शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये रिक्त असलेल्या १९५ मराठी माध्यम शिक्षकांच्या जागांचा त्वरित समावेश करावा, अशी जोरदार मागणी खानापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात त्यांनी पत्र पाठवून मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या D.Ed. आणि B.Ed. अर्हताप्राप्त उमेदवारांवर होत असलेला अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे.
कर्नाटक शासनाच्या शिक्षण विभागामार्फत राज्यात सुमारे १५ हजार शिक्षक जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे. बेळगाव विभागात यापूर्वी ३३१ शिक्षक जागा मंजूर झाल्या असल्या, तरी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत मराठी आणि इतर अल्पसंख्याक माध्यमांच्या रिक्त जागांची माहिती समाविष्ट करण्यात आलेली नाही.
खानापूर तालुक्यात एकूण २९७ रिक्त जागांपैकी तब्बल १९५ जागा मराठी माध्यमाच्या आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे आमदार हलगेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
माध्यमिक शिक्षक भरतीच्या जीपीटी (GPT) व इतर प्रवर्गांच्या अधिसूचनेत मराठी माध्यमाच्या जागा न जोडल्यामुळे मराठी तरुण-तरुणींचे भविष्य धोक्यात आले आहे. खानापूर तालुक्यातील बहुसंख्येने मराठी बोलणारे तालुके व शाळांची गरज लक्षात घेऊन या भरतीत मराठी माध्यमाच्या १९५ जागांचा तात्काळ समावेश करावा, असे आमदार हलगेकर यांनी म्हटले आहे.





