बेळगाव : सांगली-कुपवाड येथील केसरेकर दांपत्याच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपींना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा, तसेच अनाथ झालेल्या त्यांच्या दोन मुलांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी बेळगाव येथील मराठा समाज आणि मराठी भाषिकांच्या वतीने करण्यात आली.
यासंदर्भात बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देण्यात आले. मूळचे बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हेब्बाळ गावचे रहिवासी असलेले मोहन केसरकर व त्यांच्या पत्नी मनीषा केसरकर हे उदरनिर्वाहासाठी सांगली येथे स्थायिक झाले होते. कुपवाड येथील MIDC पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्यांची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे.
या घटनेमुळे केसरकर दांपत्याची दोन मुले मनाली आणि मनोज यांनी आई-वडिलांचे छत्र गमावले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने समन्वयाने पुढाकार घेऊन या मुलांच्या शिक्षणासह त्यांच्या भवितव्याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
प्रमुख मागण्या
- या संवेदनशील प्रकरणासाठी अॅड. हर्षद निंबाळकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी.
- प्रकरणाची सुनावणी फास्ट-ट्रॅक न्यायालयात करून जलदगतीने न्याय द्यावा.
- तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवून निष्पक्ष आणि सखोल तपास करावा.
- आरोपींविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करावे.
- दोष सिद्ध झाल्यास आरोपींना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा लागू असल्यास तीही, देण्यात यावी.
- अनाथ झालेल्या मनाली आणि मनोज यांच्या पालनपोषण व शिक्षणाची शासनाने जबाबदारी घ्यावी.
- दोन्ही मुलांना प्रत्येकी दरमहा १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी.
- शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार शासकीय सेवेत संधी देण्यासाठी आवश्यक ती शासकीय मदत व सवलतींचा विचार करावा.
- फिर्यादी, दोन्ही मुले आणि महत्त्वाच्या साक्षीदारांना आवश्यकतेनुसार पोलीस संरक्षण द्यावे.
केसरकर कुटुंबाची मुळे बेळगाव जिल्ह्यात असल्याने जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात विशेष लक्ष घालून महाराष्ट्र शासन, कर्नाटक शासन तसेच संबंधित गृह विभागांकडे पाठपुरावा करावा, अशी मागणीही करण्यात आली.
“केसरकर कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत प्रशासनाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे आणि अनाथ मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत,” अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली.
यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, गुणवंत पाटील,रमाकांत कोंडुस्कर, आर एम चौगुले,भरत पाटील, सागर पाटील सुनील बोकडे, माजी महापौर सरिता पाटील, रेणू किल्लेकर सुधा भातखंडे, कपिल भोसले, शरद पाटील यांच्यासह शेकडो मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले होते.





