बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहर पोलिसांनी अवैध मटका-जुगार आणि बेकायदा दारू विक्रीविरोधात कारवाई करत तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत. मारिहाळ आणि हिरेबागेवाडी पोलिसांनी २० ऑगस्ट रोजी या कारवाया केल्या.
मारिहाळ पोलिसांची मटका-जुगारावर कारवाई
बाळेकुंद्री येथील आंजनेय मंदिराजवळ सार्वजनिक ठिकाणी आकड्यांवर पैसे लावून ओसी-मटका जुगार खेळवला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मारिहाळ पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत मुत्तप्पा शिवप्पा राठोड (३५, रा. आंजनेयनगर, बाळेकुंद्री) याला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडून रोख रक्कम, ओसी चिठ्ठ्या आणि पेन जप्त करण्यात आले. चौकशीत जुगारातून जमा झालेली रक्कम आरोपी क्रमांक दोन आणि बुकी संजू सनदी याला देत असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मारिहाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिरेबागेवाडी पोलिसांची अवैध दारूविरोधात कारवाई
कमरट्टी बसस्थानकाजवळ विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या शंकर बसवण्णे चौगला (५५, रा. चावट गल्ली, बेळगाव) याला हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून विविध कंपन्यांची २५ टेट्रा पॅकेट्स आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.
हुदलीतही अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई
मारिहाळ पोलिसांनी हुदली-तुम्मरगुड्डी रस्त्यावर कारवाई करत बाळप्पा बसप्पा नेलगंटी (६४, रा. रामेश्वर गल्ली, हुदली) याला अटक केली. त्याच्याकडून विविध कंपन्यांच्या व्हिस्कीची ३४ टेट्रा पॅकेट्स जप्त करण्यात आली.
या तिन्ही प्रकरणांत संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू आहे. कारवाई करणाऱ्या पीएसआय, एएसआय आणि पोलिस कर्मचाऱ्यांचे बेळगाव शहर पोलिस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे.





