belgaum

घरासाठी २५ वर्षांपासून संघर्ष, डीसीकडे मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील हलकर्णी ग्रामपंचायत हद्दीतील हत्तरगुंजी गावातील बेघर महिलांनी निवाऱ्यासाठी सरकारी जमिनीवर जागा अथवा घर मंजूर करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित प्रशासनाला निवेदन सादर केले.

निवेदनानुसार, या महिला गेल्या २५ ते ३० वर्षांपासून हलकर्णी परिसरात वास्तव्य करत असून अनेक कुटुंबे आजही भाड्याच्या घरात राहत आहेत. रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबांना सध्याच्या महागाईच्या काळात स्वतःची जागा खरेदी करून घर बांधणे आर्थिकदृष्ट्या कठीण होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

हत्तरगुंजी गावातील सरकारी जमीन रि.स. नं. २४ ही पड जमीन असून, या जमिनीवर बेघर कुटुंबांना राहण्यासाठी जागा किंवा घरे मंजूर करण्यात यावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

 belgaum

यापूर्वी या जागेवर काही कुटुंबांनी तात्पुरत्या झोपड्या उभारल्या होत्या. मात्र त्या हटवण्यात आल्याने संबंधित कुटुंबांचा निवाऱ्याचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला आहे. स्वतःचे घर नसल्यामुळे वीज जोडणी, मुलांचे शिक्षण आणि इतर मूलभूत नागरी सुविधांपासूनही अडचणी निर्माण होत असल्याचे महिलांनी सांगितले.

काही कुटुंबे मागील २५ वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत असून, दर महिन्याचा भाड्याचा खर्च सहन करावा लागत असल्याने त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे सरकारने सर्वे नं. २४ मधील उपलब्ध सरकारी जमिनीचा विचार करून पात्र बेघर महिलांना व त्यांच्या कुटुंबांना जागा अथवा हक्कपत्र मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री, बेळगाव जिल्हा पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागाधिकारी, खानापूर तहसीलदार, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी आणि हलकर्णी ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

निवेदनावर मनिषा रमेश नलवडे, सुनीता राजू पवार यांच्यासह महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.