belgaum

महानगरपालिका बरखास्तीला महापौरांचा विरोध

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रशासकीय आणीबाणीचे कारण पुढे करत महानगरपालिका बरखास्त करण्यासंदर्भात प्रादेशिक आयुक्तांनी राज्य सरकारकडे शिफारस केली आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महापौर प्रीती कामकर यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, महानगरपालिका बरखास्त करण्याऐवजी तिच्या कामकाजातील अडचणी दूर करण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात महापौरांनी आयुक्तांकडे निवेदन देत बरखास्तीच्या प्रस्तावाला आपला स्पष्ट विरोध नोंदविला. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना महानगरपालिकेच्या पातळीवरही सीमाभागाच्या हितासाठी कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अशा वेळी महानगरपालिका बरखास्त करण्याचा प्रस्ताव पुढे करणे योग्य ठरणार नाही, असे कामकर यांनी म्हटले.

कन्नड संघटनांकडून करण्यात आलेल्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिका कर्नाटक राज्याच्या प्रशासनाशी तसेच राज्याच्या संस्कृतीशी बांधील असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेचे कामकाज सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय मदत देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

 belgaum

दुसरीकडे, महानगरपालिकेकडे पुरेसे कर्मचारी नसतानाही विकासकामांचा वेग कायम असल्याचे उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी सांगितले. मागील पाच महिन्यांत स्थायी समितीच्या १८ बैठका पार पडल्या असून, या बैठकींतून विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.

मनुष्यबळ अपुरे असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी पडत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाणही वाढत असल्याचे कोंगाळी यांनी सांगितले. अशा कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याची विनंती नगरविकास विभागाकडे करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न केले असून, १५व्या वित्त आयोगातून मिळणारा निधी १८ कोटी रुपयांवरून ३४ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात यश आले आहे. उपलब्ध साधनसामग्रीच्या मर्यादांमध्येही महानगरपालिका विकासकामे राबवत असल्याने बरखास्तीचा पर्याय योग्य नाही, असा दावा उपमहापौरांनी केला.

महानगरपालिका बरखास्त करण्याऐवजी रिक्त पदे भरणे, आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देणे आणि पुरेसा निधी देणे यावर सरकारने भर द्यावा. प्रशासनाला आवश्यक सहकार्य मिळाल्यास महानगरपालिकेचे कामकाज अधिक प्रभावीपणे चालविता येईल, असे उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.