belgaum

बेळगावमध्ये SIR प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण; 36,476 मतदार मॅपिंगबाहेर

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात विशेष सघन मतदार यादी पुनरिक्षण अर्थात SIR प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील तब्बल 36,476 मतदार मॅपिंगमध्ये आढळून आलेले नाहीत. या मतदारांना कारणे स्पष्ट करण्यासाठी नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

सोमवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

SIR प्रक्रियेत नाव आढळून न आल्यास संबंधित मतदारांनी आपल्या भागातील BLO (बूथ लेव्हल ऑफिसर) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

 belgaum

जिल्ह्यातील करडा मतदार यादी 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय तसेच संबंधित प्रभागातील नोटीस बोर्डवर मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. तसेच वेबसाईटच्या माध्यमातूनही मतदार यादी तपासता येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

करड्या मतदार यादीत नाव नसल्यास नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. 24 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर या कालावधीत नावाची नव्याने नोंदणी, दुरुस्ती तसेच आक्षेप नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे.

नवीन मतदार म्हणून नाव नोंदविण्यासाठी फॉर्म-6, NRI मतदारांसाठी फॉर्म-6A, नाव वगळण्यासाठी किंवा आक्षेप नोंदविण्यासाठी फॉर्म-7, तर मतदारांच्या तपशीलात दुरुस्ती किंवा एका विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतर करण्यासाठी फॉर्म-8 वापरता येणार आहे.

SIR प्रक्रियेत जिल्ह्यातील एकूण 41,07,000 मतदारांपैकी 35,93,561 मतदारांची नावे कायम ठेवण्यात आली आहेत. मृत्यू झालेल्या, स्थलांतरित झालेल्या तसेच इतर कारणांमुळे मॅपिंग न झालेल्या मतदारांच्या नावांची पडताळणी सुरू आहे. आतापर्यंत 1,34,903 मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.

24 ऑगस्टपासून नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, 22 सप्टेंबरपर्यंत ग्रामपंचायत स्तरावर सुनावणी घेतली जाणार आहे. नावाबाबत दुरुस्ती किंवा आक्षेप असल्यास संबंधित नागरिकांना आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. निर्धारित 11 कागदपत्रांपैकी वयाचा पुरावा आणि जन्मस्थळाशी संबंधित कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावी लागणार आहेत. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पात्र मतदारांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट केली जातील.

दरम्यान, प्रत्येक नागरिकाने करड्या मतदार यादीत आपले नाव तपासणे आवश्यक आहे. नाव नसल्यास फॉर्म-6 भरून नव्याने मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

याशिवाय जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली असून, आता एकूण 4,644 मतदान केंद्रे असणार आहेत. यामध्ये 119 नवीन मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.