बेळगाव लाईव्ह : शहरात झाडांची छाटणी, फळे काढणी, फवारणी तसेच पथदीप दुरुस्ती यांसारखी उंचीवरील विविध कामे सुरक्षित, सोप्या आणि जलद पद्धतीने पार पाडण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आधुनिक ‘शक्तीमान STMP-26 अल्ट्रा’ स्वयंचलित प्लॅटफॉर्म यंत्राचे प्रात्यक्षिक नुकतेच बेळगाव महानगरपालिकेच्या प्रांगणात पार पडले.
महानगरपालिकेच्या महापौरा प्रिती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी आणि नगरसेवक संतोष पेडणेकर यांनी या यंत्राच्या कार्यक्षमतेची पाहणी करून त्याच्या विविध उपयोगांविषयी माहिती घेतली. या वेळी शक्तीमान कंपनीच्या अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी यंत्राची कार्यपद्धती व तांत्रिक वैशिष्ट्ये सविस्तरपणे समजावून सांगितली.
शक्तीमान STMP-26 अल्ट्रा हे स्वयंचलित आणि हायड्रॉलिक प्रणालीवर चालणारे आधुनिक यंत्र असून, ते तब्बल ८ मीटर उंचीपर्यंत काम करण्यास सक्षम आहे. सुमारे १,९०० किलोग्रॅम वजन असलेल्या या यंत्राचा प्लॅटफॉर्म भार १४५ किलोग्रॅम इतका आहे. यामध्ये २२ एचपी (HP) वॉटर कूल्ड डिझेल इंजिन, हायड्रॉलिक लापींग टूल आणि हायड्रॉलिक चेन सॉ (करवती) देण्यात आली असून, रुंद टायरमुळे हे यंत्र विविध प्रकारच्या भूप्रदेशात सहज आणि स्थिरपणे चालवता येते.

एकाच ऑपरेटरद्वारे चालविल्या जाणाऱ्या या बहुउद्देशीय यंत्राचा वापर झाडांची छाटणी, फळे काढणी, फवारणी, पथदीप मेंटेनन्स, रंगरंगोटी, शहर स्वच्छता, विद्युत पुरवठा दुरुस्ती आणि उभ्या बागांच्या (व्हर्टिकल गार्डनिंग) देखभालीसाठी अत्यंत प्रभावीपणे करता येतो. फळे काढताना या प्लॅटफॉर्मचा वापर करून फळे थेट बास्केटमध्ये गोळा करता येत असल्याने फळांचे नुकसान टाळता येते आणि पारंपरिक पद्धतीपेक्षा हे काम अधिक सुरक्षित व जलद होते.
महानगरपालिकेच्या हद्दीत झाडे आणि पथदीपांच्या देखभालीसाठी अशा आधुनिक यंत्रांचा वापर केल्यास मानवी श्रम, वेळ आणि खर्चाची बचत होईल, तसेच कर्मचाऱ्यांची सुरक्षा देखील वाढेल, असा विश्वास यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. प्रात्यक्षिकादरम्यान विविध विभागांमधील कामांसाठी हे यंत्र कसे उपयुक्त ठरेल, याची माहिती प्रत्यक्ष करून दाखवण्यात आली.
यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





