बेळगाव लाईव्ह : महिला PSIशी संबंधित कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या व्हिडिओच्या पोस्टमध्ये हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचा संबंध असल्याचे भासवून कारागृहाची बदनामी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी हिंडलगा कारागृहाच्या सहाय्यक अधीक्षकांनी बेळगावच्या दुसऱ्या JMFC न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली आहे.
कारागृहाची प्रतिष्ठा आणि प्रतिमा मलीन करणारी माहिती सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या संध्या नागराज यांच्यासह काही व्यक्तींवर करण्यात आला आहे. दुसऱ्या JMFC न्यायालयातील सरकारी अभियोक्ता महांतेश यांच्या माध्यमातून ही खासगी तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अलीकडे एका खासगी व्यक्तीला नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल केल्याचा आरोप असलेल्या महिला PSIचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला होता. हा व्हिडिओ ‘Sandhya777nagraj’ या Instagram खात्यावर अपलोड करण्यात आल्याचा आरोप आहे.
या पोस्टमध्ये संबंधित महिला PSIने केलेला व्हिडिओ कॉल हिंडलगा कारागृहातच झाल्याचा आभास निर्माण करणारी माहिती देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच गृहमंत्री प्रियांक खर्गे आणि कारागृह सुधारणा विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांचे (ADGP) छायाचित्र वापरून ही पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

मात्र, संबंधित महिला PSI आणि हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचा कोणताही संबंध नसल्याचे कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कारागृहाचे नाव वापरून कथित अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याने कारागृहाची प्रतिष्ठा मलिन झाली असल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, याच प्रकरणाशी संबंधित आरोपांवरून यापूर्वी हिंडलगा कारागृहात असलेल्या तुमकूर येथील कैदी साईकुमार याच्याविरुद्धही तक्रार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कारागृहाबाबत खोटी आणि बदनामीकारक माहिती प्रसारित केल्याप्रकरणी संबंधित आरोपींवर BNS कलम 356(2) आणि 356(3) अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे.





