belgaum

पदापेक्षा माणुसकी मोठी!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : वर्दी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो कडक शिस्तीचा अधिकारी… कायदा-सुव्यवस्था आणि बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणारा पोलीस. मात्र, याच वर्दीमागे संवेदनशील माणूसही असतो, याची जाणीव करून देणारा प्रसंग बेळगावच्या चन्नम्मा चौकात पाहायला मिळाला.

भाजपच्या आंदोलनासाठी कार्यकर्ते चन्नम्मा चौकात जमले होते. आंदोलन सुरू असतानाच अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. घोषणाबाजी सुरू असतानाच पावसाचा जोर वाढला आणि आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या काही वृद्धांची चांगलीच गैरसोय झाली.

यावेळी बंदोबस्ताची पाहणी करत असलेले बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या नजरेस ही बाब पडली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पुढे होत या वृद्धांना चक्क स्वतःच्या छत्रीचा आसरा दिला.

 belgaum

पोलिस आयुक्तांचा हा साधा वाटणारा, पण मनाला भिडणारा क्षण उपस्थितांच्या नजरेत भरला. एका बाजूला आंदोलन, घोषणाबाजी आणि पोलिसांचा कडक बंदोबस्त… तर दुसऱ्या बाजूला वयस्कर नागरिकांना पावसापासून वाचवण्यासाठी पुढे आलेला एक संवेदनशील पोलीस अधिकारी.

त्या क्षणी त्यांच्या समोर वर्दी, पद किंवा अधिकार नव्हता; समोर होता तो एक माणूस आणि दुसऱ्या माणसाला मदत करण्याची भावना.

पोलीस दलात कर्तव्य बजावताना अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात. मात्र, कर्तव्याच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारे प्रसंग क्वचितच पाहायला मिळतात. त्यातही हा प्रसंग एका कॉन्स्टेबल किंवा निरीक्षकाचा नव्हे, तर शहराच्या पोलीस आयुक्तपदावर असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचा असल्याने त्याचे विशेष महत्त्व अधोरेखित होते.

गेल्या काही काळात बेळगाव शहरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या कार्यपद्धतीची चर्चा होत आहे. मात्र, चन्नम्मा चौकातील या प्रसंगातून त्यांच्या कर्तव्यदक्षतेसोबतच संवेदनशील आणि माणुसकी जपणाऱ्या अधिकाऱ्याची एक वेगळी बाजू समोर आली.

कारण पोलीस असणं ही जबाबदारी आहे… पण माणुसकी जपणं हा धर्म आहे.

आणि चन्नम्मा चौकातील पावसात पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी हा माणुसकीचा धर्म निभावला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.