बेळगाव लाईव्ह: जिल्ह्यात विशेष सघन मतदार पुनरिक्षणाच्या (SIR) प्रक्रियेला वेग आला असून, 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये 4,525 बीएलओंच्या माध्यमातून सुमारे 41 लाख एन्युमरेशन फॉर्मचे वितरण करण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत 35 लाख 93 हजार 561 फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.
पुनरिक्षणाच्या प्रक्रियेत 36 हजार 476 मतदारांचे मॅपिंग झाले नसल्याचे आढळून आले आहे. तसेच 1 लाख 34 हजार 903 मृत मतदार, 26 हजार 459 अनुपस्थित मतदार आणि 2 लाख 83 हजार 249 कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांची ओळख पटली आहे. या मतदारांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली आहे.
24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी
जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यानंतर नागरिकांना एक महिन्याच्या कालावधीत यादीबाबत हरकती व दावे दाखल करता येणार आहेत. ज्या मतदारांच्या नोंदींना लिंक किंवा नातेवाईकांचे मॅपिंग उपलब्ध नाही, अशा मतदारांना 24 ऑगस्टपासून नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
बीएलओंना संबंधित मतदारांना नोटिसा प्रत्यक्ष पोहोचवून, त्याचे छायाचित्र आणि आवश्यक कागदपत्रे मोबाईल ॲपवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जन्मतारखेनुसार कागदपत्रांची आवश्यकता
भारतामध्ये 1 जुलै 1987 पूर्वी जन्मलेल्या मतदारांना स्वतःची पात्रता सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
तर 1 जुलै 1987 ते 2 डिसेंबर 2004 या कालावधीत जन्मलेल्या मतदारांना स्वतःची कागदपत्रे तसेच आई किंवा वडिलांच्या जन्मतारखेचा आणि जन्मस्थळाचा पुरावा सादर करावा लागणार आहे.
नोटिसांची योग्य पडताळणी करून त्यासंबंधीची कार्यवाही निर्धारित सॉफ्टवेअरमध्ये नोंदविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नोटिसांशी संबंधित तक्रारी शक्यतो 15 ते 20 दिवसांत निकाली काढण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

18 मतदारसंघांसाठी 126 अतिरिक्त AERO
जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांसाठी 126 अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) नियुक्त करण्यात आले आहेत. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी वॉर्ड तसेच ग्रामपंचायत पातळीवर सुनावणीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म-6 सादर करून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी मिळणार आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बीएलओ तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मतदार पुनरिक्षणाच्या प्रक्रियेत काळजीपूर्वक काम करण्याचे आवाहन केले आहे. एकही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाऊ नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.





