बेळगाव लाईव्ह : चिकोडी शहरातील विविध हॉटेल आणि ढाब्यांमध्ये व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलिंडरचा अनधिकृत वापर केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार राजेश बुरली यांच्या नेतृत्वाखाली २१ ऑगस्ट रोजी धडक कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान शहरातील विविध हॉटेल आणि ढाब्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांनी कारवाई करत तब्बल २९ घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले.
घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणे कायद्याने प्रतिबंधित आहे. त्यामुळे हॉटेल आणि ढाबा चालकांनी अधिकृत व्यावसायिक गॅस सिलिंडरच वापरावेत, असे आवाहन तहसीलदार राजेश बुरली यांनी केले.
तसेच घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करताना आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही तहसीलदारांनी दिला.
या कारवाईत अन्न विभागाचे अधिकारी तथा अन्न शिरस्तेदार हनुमंत कांडेकर आणि अन्न निरीक्षक ऐश्वर्या दिवटे सहभागी झाले होते.





