belgaum

केसरेकर दाम्पत्याच्या मुलांना सरकारने तातडीची मदत करावी

0
Kiran jadhav
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी परिसरात झालेल्या हल्ल्यात खानापूर तालुक्यातील हेब्बाळ येथील मोहन नागाप्पा केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनिषा मोहन केसरेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पती-पत्नी दोघांचेही निधन झाल्याने त्यांच्या दोन मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. त्यामुळे या मुलांच्या शिक्षणासह पालनपोषण आणि भवितव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेते तथा सकल मराठा समाजाचे प्रमुख किरण जाधव यांनी महाराष्ट्र सरकारने संवेदनशीलतेने पुढाकार घेऊन केसरेकर कुटुंबातील दोन मुलांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे.

मोहन केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनिषा हे रोजगाराच्या निमित्ताने महाराष्ट्रात गेले होते. १५ ऑगस्ट रोजी कुपवाड एमआयडीसी परिसरातील विघ्नहर्ता शांती कॉलनी येथे त्यांच्यावर हातोडी आणि चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनिषा केसरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मोहन केसरेकर यांचाही १८ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला.

 belgaum

पती-पत्नी दोघांचाही काही दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याने त्यांच्या दोन मुलांवर मोठे संकट कोसळले आहे. कुटुंबातील कमावते आई-वडील गमावल्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा, पालनपोषणाचा आणि भविष्यातील उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी करत किरण जाधव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना पत्र पाठविले आहे. हल्ल्यातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून प्रकरणाचा जलदगतीने तपास व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करावी. दोष सिद्ध झाल्यास आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

तसेच, आई-वडील दोघांनाही गमावलेल्या केसरेकर कुटुंबातील मुलांच्या शिक्षण, पालनपोषण आणि भविष्यातील उदरनिर्वाहाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने मानवतेच्या दृष्टिकोनातून स्वीकारावी. त्यांना तातडीने योग्य ती आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती जाधव यांनी पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान, केसरेकर दाम्पत्याला न्याय मिळावा आणि त्यांच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत मिळावी, यासाठी बेळगाव शहरात मराठा समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वनियोजित महाराष्ट्र दौऱ्यामुळे या मोर्चात प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही, याबद्दल किरण जाधव यांनी दिलगिरी व्यक्त केली.

मात्र, मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या सर्व मागण्यांना आपला संपूर्ण आणि ठाम पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केसरेकर कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या प्रत्येक प्रयत्नात आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असेही किरण जाधव यांनी सांगितले.

“केसरेकर कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठीची लढाई आपण सर्वजण मिळून पुढे नेऊ. त्यांच्या मुलांच्या भवितव्याला आधार मिळण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत,” अशी अपेक्षा किरण जाधव यांनी व्यक्त केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.