belgaum

ईद-ए-मिलाद मिरवणुकीत डीजेवर बंदी;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ, पोलीस आयुक्त तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि सीरत कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यंदाच्या ईद-ए-मिलाद मिरवणुकीत डीजेच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले. शहरातील सर्व धार्मिक मिरवणुकांमध्ये डीजे बंदी लागू असून, त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी सीरत कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना आणि आयोजकांना केले.

अत्याधिक आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, मोठ्या आवाजाच्या डीजेमुळे काही जणांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत नमूद केले. उत्सवाच्या नावाखाली वाढत जाणारी ध्वनीची स्पर्धा टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.

 belgaum

मिरवणुकीच्या मार्गातील वीजवाहिन्यांमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी आवश्यक त्या ठिकाणी वीजपुरवठ्याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना हेस्कॉम अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच संवेदनशील ठिकाणे, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

पोलीस आयुक्तांनी यापूर्वीच विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शांतता समितीच्या बैठका घेतल्या असून, स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर चर्चा करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आमदार आसिफ सेठ यांनी प्रशासनाच्या डीजे बंदीच्या निर्णयाचे स्वागत केले. ईद-ए-मिलादचा संदेश हा अमन, शांतता, बंधुभाव आणि गरजूंच्या मदतीचा असल्याचे सांगत प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

ईद-ए-मिलादचा उत्सव शांततेत, शिस्तीत आणि सर्व समाजांना सोबत घेऊन साजरा करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.