बेळगाव लाईव्ह : बळ्ळारी नाल्याच्या पुरामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असून, गेल्या अनेक वर्षांपासून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर बळ्ळारी नाल्याच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्यासाठी शेतकरी संघटना आणि बळ्ळारी नाला विकास समितीच्या वतीने महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता वडगाव येथील राजवाडा कंपाउंडमधील श्री ज्ञानेश्वर मंदिर येथे ही बैठक होणार आहे. वडगाव, जुने बेळगाव, शहापूर आणि अनगोळ परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बळ्ळारी नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ, जलपर्णी आणि कचरा साचल्याने पावसाचे पाणी सुरळीतपणे वाहून जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत. नाल्याचा प्रवाह अनेक ठिकाणी अरुंद झाल्याने मुसळधार पावसात पाणी तुंबून ते शेतांमध्ये शिरते. परिणामी भातासह विविध पिकांचे नुकसान होण्याचा धोका निर्माण होतो. याच समस्येमुळे दरवर्षी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे.
बळ्ळारी नाल्याची खोदाई, गाळ काढणे, जलपर्णी व कचरा हटविणे, पाण्याचा प्रवाह सुरळीत करणे तसेच पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने केली जात आहे. नाल्यालगतच्या भागातील पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यास पावसाळ्यात पुन्हा शेतांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

दरवर्षी पूर, दरवर्षी नुकसान आणि आश्वासनांपलीकडे काहीच नाही, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. त्यामुळे यावेळी केवळ चर्चा न करता बळ्ळारी नाल्याच्या प्रश्नावर ठोस कृती आराखडा तयार करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी बैठकीत निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या बैठकीत परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी, नाल्याची सद्यस्थिती आणि पूरनियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे संबंधित सर्व शेतकरी बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटना आणि बळ्ळारी नाला विकास समितीने केले आहे.





