belgaum

त्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची नेकार संघटनेची मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : हातमाग कारखान्यात काम करणारे विठ्ठल लोकरी यांनी कर्जाच्या बोजामुळे १६ ऑगस्ट २०२६ रोजी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबाला शासनाने तातडीने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी आणि कुटुंबावरील सुमारे ६ लाख रुपयांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी कूली नेकार कामगार संघटनेने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देऊन केली.

बेळगाव शहरातील वडगाव आणि खासबाग परिसर हातमाग व यंत्रमाग उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. या भागात मोठ्या संख्येने हातमाग व यंत्रमाग कारखाने असून, हजारो महिला आणि पुरुष कामगार या उद्योगावर अवलंबून आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून कामगारांना किमान वेतन, ईएसआय, पीएफ, बोनस यांसारख्या कायदेशीर सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल लोकरी यांच्या पत्नीच्या उपचारासाठी तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी सुमारे ६ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाचा वाढता भार आणि आर्थिक अडचणींमुळे ते त्रस्त होते. अखेर १६ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांनी आपण काम करत असलेल्या हातमाग कारखान्यातच आत्महत्या केली.

 belgaum

विठ्ठल लोकरी यांच्या निधनामुळे त्यांच्या आजारी पत्नी आणि तीन मुलींच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. त्यांची मोठी मुलगी प्रथम पीयूसीमध्ये, दुसरी मुलगी आठवीत, तर तिसरी मुलगी तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. वडिलांच्या निधनानंतर मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि आईच्या उपचारांचा खर्च भागविण्याचे मोठे आव्हान कुटुंबासमोर आहे.

हातमाग आणि यंत्रमाग उद्योगासाठी शासनाकडून विविध सवलती व आर्थिक योजना राबविल्या जातात. मात्र, या योजनांचा लाभ प्रामुख्याने कारखानदारांना मिळतो, तर प्रत्यक्ष कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही, असा आरोप संघटनेने केला आहे.

वाढती महागाई, मजुरीत वाढ न होणे आणि काही ठिकाणी मजुरी कपात यामुळे कामगार कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट होत असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. कामगारांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

विठ्ठल लोकरी यांच्या कुटुंबाला तातडीने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी आणि त्यांच्या कुटुंबावरील ६ लाख रुपयांचे कर्ज माफ करावे, ही निवेदनातील प्रमुख मागणी आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली.

“उद्योगही टिकला पाहिजे आणि श्रमिकालाही सन्मानाने जगता आले पाहिजे,” अशी भूमिका संघटनेने मांडली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.