belgaum

SIR : मसुदा मतदार यादीतून नाव वगळलेल्यांनी घाबरू नये;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : SIR अर्थात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतून नाव वगळले गेलेल्या मतदारांनी घाबरून जाण्याची गरज नाही. नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी विशेष प्रक्रिया उपलब्ध असून, संबंधितांनी निर्धारित कालावधीत आक्षेप नोंदवावा, असे बेळगाव महानगरपालिका आयुक्त तथा मतदार मुख्य नोंदणी अधिकारी कार्तिक एम. यांनी सांगितले.

सोमवारी महानगरपालिका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी SIR प्रक्रियेबाबत माहिती दिली. बेळगाव महानगरपालिका हद्दीतील उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये नमुने वाटप, परत घेणे आणि संगणकीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांना निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले नाव तपासता येणार आहे.

नाव वगळलेल्यांसाठी विशेष प्रक्रिया

संशयास्पद नोंदी, स्थलांतरित मतदार किंवा मृत मतदार अशा कारणांमुळे काही नावे मसुदा यादीतून वगळण्यात आली आहेत. अशा मतदारांनी नाव समाविष्ट करण्यासाठी SIR विभागाकडे आक्षेप नोंदवावा. त्यानंतर संबंधितांना देण्यात येणाऱ्या नोटिशीला उत्तर देताना चौकशी अधिकारी किंवा AERO यांच्यासमोर प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक पूरक कागदपत्रे सादर करावी लागतील.

 belgaum

तसेच मॅपिंग किंवा प्रोजेनी लिंक न झाल्यामुळे ‘नो लिंकज’मध्ये असलेले मतदार आणि नवीन मतदारही आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म क्रमांक 6 भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेऊ शकतात.

आक्षेप नोंदविण्यासाठी 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आक्षेपांच्या निपटाऱ्याची प्रक्रिया 22 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, 27 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

दक्षिण मतदारसंघातील स्थिती

दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण 2,52,937 मतदार आहेत. सर्व मतदारांना नमुने वितरित करण्यात आले होते. त्यापैकी 1,93,755 नमुने म्हणजेच 76.60 टक्के नमुन्यांचे संगणकीकरण झाले आहे. या मतदारसंघात 59,182 ASD/ASDDO नोंदी असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

उत्तर मतदारसंघात 64,306 नोंदी

उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण 2,56,678 मतदार असून सर्वांना नमुने देण्यात आले होते. त्यापैकी 1,92,372 नमुने म्हणजेच 74.95 टक्के नमुने संगणकीकृत झाले आहेत. या मतदारसंघात 64,306 ASD/ASDDO नोंदी आहेत.

SIR प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. तसेच महानगरातील नागरिक, महापौर, उपमहापौर, नगरसेवक, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि माध्यमांनी सहकार्य केले. SIRच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी तसेच शिक्षकांनी दिवसरात्र मेहनत घेतल्याबद्दल आयुक्त कार्तिक एम. यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा महानगरपालिका महसूल विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्दू हुल्लोळी, उत्तर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा विकास विभागाच्या उपायुक्त लक्ष्मी निप्पाणिकर आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रशासन विभागाचे उपायुक्त उदयकुमार टी.बी. उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.