बेळगाव लाईव्ह : बेळगावातील बीआयएमएस (BIMS) मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात गुरुवारी सकाळपासून सर्व्हर डाऊन झाल्याने शेकडो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. नोंदणी, तपासण्यांची बिले आणि इतर प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाल्याने रुग्णालय परिसरात नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे आठ वाजल्यापासूनच सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे नोंदणी केंद्र आणि बिलिंग काउंटरवरील कामकाज ठप्प झाले. सीटी स्कॅन, रक्त तपासणी, शुगर टेस्ट, एक्स-रे, इको यांसारख्या विविध तपासण्यांसाठी आधी बिल भरणे आवश्यक असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागली.
चार ते पाच तास रांगेत उभे राहूनही बिल भरता येत नसल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. “उपचाराआधी बिल अनिवार्य आहे, पण सर्व्हरच बंद असेल तर रुग्णांनी काय करायचे? या विलंबामुळे रुग्णाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

नागरिकांनी सर्व्हर सुरू होण्याची वाट पाहण्याऐवजी तात्पुरत्या स्वरूपात मॅन्युअल बिलिंग व्यवस्था सुरू करण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाकडून सर्व्हर डाऊन असल्याचे कारण देत वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोपही अनेकांनी केला.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने तांत्रिक अडचण दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले असून, ही समस्या तातडीने सोडवून रुग्णांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सर्व्हर बंद पडल्यामुळे उपचार प्रक्रियेलाच विलंब होत असल्याने बीआयएमएसमधील व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





