बेळगाव लाईव्ह : निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या एसआयआर (मतदार फेरनिरीक्षण प्रक्रिया) अंतर्गत मतदारांची नावे नव्याने समाविष्ट करणे तसेच मृत किंवा बोगस मतदारांची नावे वगळण्यासाठी बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत पडताळणी सुरू आहे.
या प्रक्रियेबाबत राष्ट्रीय पक्षांच्या बूथ एजंटांना पूर्वीच मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, ग्रामपंचायतीपासून आमदारकीपर्यंत प्रतिनिधित्व असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रतिनिधींना अपक्ष म्हणून या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव येथे बैठक घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांना समितीच्या बूथ एजंटांचा समावेश करण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे. तसेच सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांचा विचार करून एसआयआरसाठी लागणारे अर्ज मराठी भाषेतही उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही निवडणूक आयोग आणि संबंधित प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
मात्र, अद्यापही मराठीतील अर्ज उपलब्ध करून न देता प्रक्रिया सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचा फायदा राष्ट्रीय पक्षांचे बूथ एजंट घेत असून, मराठी व समितीप्रेमी मतदारांचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर धनंजय पाटील यांनी खानापूर तालुक्यातील मराठी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विवाहानंतर गाव बदललेल्या महिलांची, नव्याने स्थलांतरित झालेल्या नागरिकांची तसेच गावातून इतरत्र गेलेल्या मतदारांची नावे संबंधित बूथवर योग्य प्रकारे समाविष्ट करण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
सरकारी बूथ लेव्हल अधिकाऱ्यांसोबतच राष्ट्रीय पक्षांचे प्रशिक्षित बूथ एजंटही सक्रिय असल्याने प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या मतदार नोंदणीबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. “आपले घर हाच आपला बूथ आणि गाव-गल्ली हाच आपला वॉर्ड” समजून प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन धनंजय पाटील यांनी खानापूर तालुक्यातील मराठी जनतेला केले आहे.
व




