बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर सातत्याने राजकारण होत असताना आता SIR (Special Intensive Revision) अर्थात मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेतील अर्ज मराठीत उपलब्ध नसल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
बेळगाव लाईव्हशी बोलताना ॲड. येळ्ळूरकर म्हणाले की, एकीकडे मराठी भाषिकांना घटनात्मक अधिकारांच्या प्रश्नावर सरकार टाळाटाळ करत असल्याची भावना आहे, तर दुसरीकडे मतदार यादी पुनरावलोकनासाठीचे SIR अर्जही मराठीत उपलब्ध करून दिले जात नाहीत. त्यामुळे हजारो मराठी भाषिक मतदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यांनी सांगितले की, बेळगावसह सीमाभागात मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक मतदार आहेत. अशा परिस्थितीत मतदारांना समजणाऱ्या भाषेत अर्ज उपलब्ध करून देणे ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. केवळ कन्नड भाषेतील अर्ज उपलब्ध असल्यामुळे अनेकांना प्रक्रिया समजून घेणे कठीण जात आहे.
ॲड. येळ्ळूरकर यांनी विशेषतः भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसह इतर प्रादेशिक पक्षांना प्रश्न विचारत, मराठी SIR अर्जाबाबत आपली अधिकृत भूमिका जाहीर करण्याचे आवाहन केले. तसेच बेळगाव महापालिकेतील मराठी नगरसेवकांनीही या विषयावर स्पष्ट भूमिका घेऊन मराठी भाषिकांच्या हितासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

“लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो. मात्र मतदारालाच सरकारने उपलब्ध करून दिलेला अर्ज समजत नसेल, तर त्याच्या मतदानाच्या अधिकारावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मतदारांना त्यांच्या भाषेत अर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
मराठी भाषिक मतदारांच्या सोयीसाठी SIR अर्ज मराठीत उपलब्ध करून देण्याबाबत सरकारने आणि प्रमुख राजकीय पक्षांनी तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी केली आहे.




