belgaum

खादरवाडीच्या ‘श्री ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लब’चा देशसेवेचा अनोखा यज्ञ

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढीला योग्य दिशा मिळणे अत्यंत गरजेचे झाले आहे. नेमके हेच ओळखून, खादरवाडीतील तरुणाईला सुदृढ, सक्षम आणि देशप्रेमी बनवण्यासाठी ‘श्री ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लब, खादरवाडी’ हा एक आशेचा नवा किरण ठरत आहे. २०२३ साली स्थापना झालेल्या या क्लबने अत्यंत कमी कालावधीत जी गरुडझेप घेतली आहे, ती संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद ठरत आहे.

या स्पोर्ट्स क्लबचे मुख्य मार्गदर्शक आणि कोच अमित बिर्जे हे भारतीय भूसेना दलातून आपली देशसेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले आहेत. सीमेवरून परतल्यानंतर त्यांनी विश्रांती न घेता, समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य म्हणून या क्लबची स्थापना केली. आजच्या मुले-मुलींमध्ये शारीरिक आणि मानसिक ताकद निर्माण व्हावी, तसेच त्यांनी देशाचे रक्षण करावे, या उद्देशाने ते येथील तरुणांना पूर्णपणे मोफत प्रशिक्षण देत आहेत.

या महान कार्यात त्यांना खादरवाडी हायस्कूलचे क्रीडा शिक्षक गजानन विठ्ठल गुरव यांची मोलाची साथ लाभली आहे. गजानन गुरव यांचे मूळ गाव हलगा असून, त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण हलगा येथे व माध्यमिक शिक्षण वनश्री हायस्कूल येथे पूर्ण केले आहे.

 belgaum

विशेष आणि कौतुकास्पद बाब म्हणजे, कोच अमित बिर्जे आणि क्रीडा शिक्षक गजानन गुरव या दोन्ही प्रशिक्षकांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण कोणत्याही मोठ्या कार्यात अडथळा ठरत नाही, तर ते देशसेवेची पाळेमुळे अधिक घट्ट करते, हे या दोघांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या निस्वार्थी योगदानाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

‘श्री ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लब’च्या शिस्तबद्ध आणि खडतर प्रशिक्षणाचे फळ आता दिसू लागले आहे. या क्लबमधून प्रशिक्षण घेऊन आजपर्यंत तब्बल ४२ मुले आणि मुली भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत. ग्रामीण भागातील एका क्लबसाठी आणि संपूर्ण खादरवाडी गावासाठी ही अत्यंत गौरवाची आणि ऐतिहासिक बाब आहे.

पैशांअभावी कोणत्याही गरीब व होतकरू विद्यार्थ्याचे स्वप्न अपूर्ण राहू नये, यासाठी हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाते. सध्या या क्लबमध्ये २०० मुले आणि ५० मुली असे एकूण २५० हून अधिक भावी सैनिक अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने शारीरिक व मानसिक तयारी करत आहेत.

खादरवाडीचे ‘श्री ब्रह्मलिंग स्पोर्ट्स क्लब’ हे केवळ एक क्रीडा केंद्र नसून, ते देशसेवेसाठी तरुणांना घडवणारी एक उत्तम ‘ट्रेनिंग अकॅडमी’ बनले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.