बेळगाव लाईव्ह: यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला अद्याप पावणे दोन महिने शिल्लक असतानाच मध्यवर्ती सार्वजनिक श्रीगणेशोत्सव महामंडळाने उत्सवाच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या १२ दिवसांच्या गणेशोत्सवासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
यावेळी महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, कार्याध्यक्ष रणजित चव्हाण, सरचिटणीस महादेव पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, तसेच सुनील बोकडे, सागर पाटील, बाळू जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महामंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सर्व संबंधित विभागांची संयुक्त तयारी बैठक तातडीने बोलावण्याची विनंती करण्यात आली. या बैठकीत गणेश मंडळांच्या अडीअडचणी, सुरक्षा, वाहतूक, वीज, स्वच्छता आणि इतर विषयांवर चर्चा करून नियोजन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रमुख मागण्या अशा
- शहरातील ८ पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात ‘सिंगल विंडो परवानगी व्यवस्था’ सुरू करावी.
- जुनी महापालिका इमारत (रिसालदार गल्ली) आणि गोवावेस येथील महापालिका कार्यालयात एकाच ठिकाणी सर्व विभागांच्या परवानग्या मिळण्याची सुविधा उपलब्ध करावी.
- उत्सवापूर्वी शहरातील सर्व खराब रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती करावी.
- गणेश मंडळे आणि विसर्जन मार्गांवर स्वच्छतेची विशेष व्यवस्था ठेवावी.
- हेस्कॉममार्फत सुरक्षित वीजपुरवठा, धोकादायक तारा हटविणे आणि पुरेसा रस्ते प्रकाश उपलब्ध करून द्यावा.
- आरोग्य, अग्निशमन, पिण्याचे पाणी, वाहतूक, सीसीटीव्ही, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आदी सुविधा सक्षमपणे उपलब्ध कराव्यात.
- गणेश मंडळांसाठी विमा संरक्षण आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचीही मागणी करण्यात आली.
महामंडळाचे सरचिटणीस महादेव पाटील यांनी सांगितले की, गणेश मंडळांना उत्सवादरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रशासनाने सर्व विभागांचे समन्वयाने नियोजन करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाची सकारात्मक दखल घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी सांगितले की, पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनाही निवेदन देण्यात आले असून, १ सप्टेंबरपासून सिंगल विंडो प्रणाली सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी आज सायंकाळी ५ वाजता महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून, उत्सवाच्या सुरक्षा आणि नियोजनावर सविस्तर चर्चा होणार आहे.





