बेळगाव लाईव्ह: उद्यंबाग पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे ६५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
गुरुप्रसाद नगर, गणेश मंदिरासमोर, कावेरी नगर येथील रहिवासी नागराज रामचंद्र आचारी यांनी त्यांची होंडा डिओ (क्र. KA-05-EW-5831) ही दुचाकी १७ जुलै रोजी चोरीला गेल्याची तक्रार २२ जुलै रोजी उद्यंबाग पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ७३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला.
पोलीस निरीक्षक महांतेश व्ही. होसपेटी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय यू. बी. कट्टीकर, पीएसआय प्रवीण बिरादार तसेच तपास पथकाने आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली.

त्यांच्याकडून होंडा डिओ (KA-05-EW-5831) तसेच KA-24-S-2395 क्रमांकाची आणखी एक दुचाकी जप्त करण्यात आली. या दोन्ही वाहनांची एकूण किंमत सुमारे ६५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन्ही अल्पवयीनांविरुद्ध बाल न्याय कायद्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, प्रकरणाचा अधिक तपास उद्यंबाग पोलीस करत आहेत.
या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावल्याबद्दल पोलीस आयुक्त, बेळगाव शहर आणि पोलीस उपायुक्त (DCP) यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.





