बेळगाव लाईव्ह : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा प्रचार मोठ्या प्रमाणावर केला जात असला, तरी प्रत्यक्षात शाडू मातीच्या गणेशमूर्ती घडविणारे कुशल मूर्तिकार दिवसेंदिवस कमी होत आहेत. वाढते उत्पादन खर्च, मेहनतीच्या तुलनेत मिळणारा कमी मोबदला आणि बाजारातील प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींची स्पर्धा यामुळे अनेक कलाकार हा पारंपरिक व्यवसाय सोडत आहेत. त्यामुळे बेळगावात शाडू मातीच्या मूर्ती तयार करणाऱ्या कलाकारांना गोवा सरकारच्या धर्तीवर प्रति मूर्ती २०० रुपये प्रोत्साहनपर मानधन देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
बेळगाव शहरासह जिल्ह्यात दरवर्षी हजारो गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन प्रशासन, पर्यावरणप्रेमी आणि विविध सामाजिक संस्था सातत्याने करतात. मात्र, शाडू मातीच्या मूर्तींची मागणी वाढविण्यासाठी आवश्यक ते आर्थिक पाठबळ कलाकारांना मिळत नसल्याची खंत मूर्तिकार व्यक्त करत आहेत.
शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्यासाठी अधिक वेळ, बारकाई, कौशल्य आणि मेहनत लागते. याशिवाय कच्चा माल, रंग, वाहतूक आणि मजुरीचा खर्चही वाढला आहे. दुसरीकडे पीओपीच्या मूर्ती कमी खर्चात आणि कमी वेळेत तयार होत असल्याने बाजारात त्यांचे प्रमाण अधिक आहे. परिणामी शाडू मातीच्या मूर्ती बनविणाऱ्या कलाकारांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेकांनी हा व्यवसाय बंद केला किंवा कमी प्रमाणात सुरू ठेवला आहे.
याचा थेट परिणाम पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेवर होत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. शाडू मातीच्या मूर्तींची उपलब्धता कमी झाल्यास भाविकांना पर्याय म्हणून पीओपी मूर्तींचाच स्वीकार करावा लागतो. त्यामुळे जलप्रदूषण रोखण्याचे उद्दिष्टही अपूर्ण राहते.
गोवा सरकारने शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कलाकारांना प्रति मूर्ती आर्थिक प्रोत्साहन देण्याची योजना राबविली आहे. त्याच धर्तीवर बेळगावातही अशी योजना लागू केल्यास स्थानिक मूर्तिकारांना मोठा आधार मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रति मूर्ती २०० रुपये मानधन मिळाल्यास अधिकाधिक कलाकार पुन्हा शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्याकडे वळतील, असे मूर्तिकारांचे मत आहे.

याशिवाय प्रशासन, महापालिका आणि पर्यावरण विभागाने संयुक्तपणे शाडू माती सहज उपलब्ध करून देणे, मूर्तिकारांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, विक्री केंद्रे उपलब्ध करून देणे तसेच पर्यावरणपूरक मूर्तींच्या खरेदीसाठी जनजागृती मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचीही गरज व्यक्त केली जात आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव केवळ आवाहनांपुरता मर्यादित न राहता त्यामागील कलाकारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी ठोस आर्थिक धोरण राबविणे ही काळाची गरज असल्याचे मत पर्यावरणप्रेमी आणि मूर्तिकारांकडून व्यक्त होत आहे. गोवा पॅटर्नप्रमाणे मानधनाची योजना लागू झाल्यास बेळगावात पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या निर्मितीला नवे बळ मिळेल आणि पारंपरिक मूर्तीकलेलाही मोठा आधार मिळेल.





