belgaum

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या १४.६० कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी

0
Bgm cantt
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि स्थानिक पायाभूत सुविधांचा कायापालट करण्यासाठी १४.६० कोटी रुपयांच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लॅनला मंजुरी देण्यात आली आहे. अर्बन चॅलेंज फंड योजनेच्या माध्यमातून कॅन्टोन्मेंट बोर्डाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी हे विविध प्रकल्प राबवण्यात येणार आहेत.

या एकूण १४.६० कोटींच्या प्रकल्पासाठी निधीचे वाटप तीन टप्प्यांत करण्यात आले आहे. यात भारत सरकारकडून २५ टक्के म्हणजेच ३.६५ कोटी रुपयांचे अनुदान मिळणार असून, कॅन्टोन्मेंट बोर्ड स्वतः ३.६५ कोटी रुपयांचा वाटा उचलणार आहे. उर्वरित ५० टक्के म्हणजेच ७.३० कोटी रुपयांचा निधी बँक किंवा सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारला जाईल. या प्रकल्पांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच घेतलेल्या कर्जाची परतफेड केली जाणार आहे.

प्रस्तावित विकासकामांमध्ये जीएलआर सर्व्हे नंबर २९९-बी मधील सध्याच्या इमारतीवर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर व्यावसायिक संकुल आणि लॉजिंगची सोय करण्यात येणार आहे. यासाठी २.११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच जीएलआर सर्व्हे नंबर १२९ मधील तलावाजवळ १.१६ कोटी रुपये खर्चाचे रेस्टॉरंट आणि फूड कोर्ट उभारण्यात येईल.

 belgaum

याशिवाय आयनॉक्स थिएटर जवळील हेड पोस्ट ऑफिस रस्त्यावर १.५१ कोटी रुपयांचे फूड कोर्ट आणि जीएलआर सर्व्हे नंबर २६९ मधील होंडा शोरूमसमोर ६.०७ कोटी रुपये खर्चून पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर शॉपिंग आणि ऑफिस कॉम्प्लेक्स उभारले जाणार आहे. तसेच ३.७५ कोटी रुपये खर्चून कम्युनिटी हॉलजवळ ओपन एअर थिएटर आणि बहुउद्देशीय हॉलची निर्मिती केली जाईल.

आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती, रोजगाराच्या नवीन संधी आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या महसुलात वाढ करून बेळगाव कॅन्टोन्मेंट क्षेत्राला प्रगतीपथावर नेणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.