belgaum

शिवसेना समितीवर बंदी घालण्यासाठी वेदिकेचा थयथयाट!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : लोकशाही आणि संविधानाच्या मार्गाने महाराष्ट्र एकीकरण समितीचे आंदोलन सुरू असताना, कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे बेळगावात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा आणि प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने लोकशाही आणि संविधानाच्या चौकटीत राहून भाषिक अल्पसंख्याकांच्या न्याय्य हक्कांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्यात येत होते.

सीमाभागातील मराठी माणसाला त्यांचे घटनात्मक अधिकार मिळावेत, शासकीय पातळीवर मराठी भाषेची गळचेपी थांबावी आणि भाषिक अल्पसंख्याक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, ही मागणी घेऊन मएसचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी एकत्र आले होते. संपूर्ण आंदोलन अत्यंत सनदशीर आणि शांततापूर्ण मार्गाने पार पडले.

मात्र, समितीचे हे आंदोलन संपताच कर्नाटक रक्षण वेदिकेच्या मुठ्भर कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे शहरात शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या उद्देशाने आरटीओ सर्कलनजीक गोळा होऊन प्रचंड गोंधळ घालण्यास सुरुवात केली. समितीच्या कायदेशीर मागण्यांना विनाकारण विरोध करण्याच्या नावाखाली करवेच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषिकांच्या विरोधात दडपशाही सुरू केली. केवळ स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि सीमाभागात भाषिक तेढ निर्माण करण्यासाठी या कन्नड संघटनांकडून जाणीवपूर्वक चिथावणीखोर वक्तव्ये करण्यात आली.

 belgaum

हे आंदोलनकर्ते हुल्लडबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करत होते. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना आरटीओ चौकातच बॅरिकेड्स लावून रोखले. मात्र, स्वतःला कायद्यापेक्षा श्रेष्ठ समजणाऱ्या करवेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत थेट पोलीस प्रशासनाशीच हुज्जत घातली.

यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली, ज्यामुळे आरटीओ सर्कल परिसरात बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला आणि प्रचंड तणाव निर्माण झाला. या गदारोळानंतर सहाय्यक आयुक्त श्रवणकुमार नायक यांनी स्वतः घटनास्थळी येऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले .

करवेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी सीमाभागातील मराठी माणसाच्या मूलभूत हक्कांवर गदा आणत , महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना या संघटनांवर तातडीने बंदी घालण्याची दर्पोक्ती केली.

मराठी भाषिकांसहित नेत्यांवर गुंडा कायदा लावून त्यांना थेट बेळगावातून तडीपार करावे, अशी प्रक्षोभक विधाने करत त्यांनी पोलीस आणि जिल्हा प्रशासनावर दबाव आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. करवेच्या या नेहमीच्या भूमिकेमुळे आणि थयथयाटामुळे बेळगाव शहरात काही काळ भीतीचे आणि प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.