बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात आजपासून ‘सेकंड व्हिजन कर्नाटक २०२६’ या तीन दिवसीय भव्य सार्वजनिक जनजागृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. नेहरू नगर येथील केएलई कन्व्हेन्शन सेंटरच्या ‘डॉ. बी. एस. जिरगे ऑडिटोरियम’मध्ये २५ जूनपर्यंत हे प्रदर्शन चालणार असून, खासदार जगदीश शेट्टर यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीच्या ‘प्रयास’ एक्झिबिशन्सने याचे आयोजन केले आहे, अशी माहिती ‘प्रयास’चे प्रमुख वनीश गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या वर्षीच्या ‘व्हिजन कर्नाटक २०२५’ च्या अभूतपूर्व यशानंतर सलग दुसऱ्या वर्षी बेळगावात हे प्रदर्शन होत आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी पूर्णपणे मोफत असून सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:३० या वेळेत खुले राहील. यामध्ये नागरिकांना केंद्र व राज्य सरकारचे विविध विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे, असे खासदार जगदीश शेट्टर यांनी सांगितले.
संरक्षण, कृषी, आरोग्य, विज्ञान-तंत्रज्ञान आणि ग्रामीण विकास यांसारख्या विविध क्षेत्रांतील तांत्रिक नवसंशोधनाबद्दल जनजागृती करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. यात अनेक नामांकित राष्ट्रीय कंपन्या आणि बँकांनी प्रायोजक म्हणून सहभाग घेतला आहे.

या प्रदर्शनात इस्रो, आयसीएमआर, संरक्षण मंत्रालय, नैऋत्य रेल्वे, पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांसह अनेक नामांकित संस्था आपले तंत्रज्ञान आणि जनकल्याणकारी योजनांचे सादरीकरण करणार आहेत.
तसेच २४ जून रोजी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत ‘फ्युचर ऑफ बेळगाव@२०४७’ या विषयावर विशेष महाचर्चा रंगणार असून, याद्वारे विकसित भारताच्या संकल्पनेनुसार बेळगावच्या विकासाचा आराखडा मांडला जाईल, अशी माहिती आयोजकांनी दिली.
ल




