बेळगाव लाईव्ह विशेष :
एखाद्या शहराची ओळख केवळ उद्योग, शिक्षण किंवा राजकारणाने होत नाही; तर त्या शहरातील संस्कृती, परंपरा आणि भक्तीभावही त्याची खरी ओळख ठरतात. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नुकत्याच पार पडलेल्या एका अनोख्या कार्यक्रमाने बेळगावचे नाव राज्यभरात अभिमानाने उच्चारले जाऊ लागले आहे.
शंकर लक्ष्मण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या विविध भजन मंडळांमधून निवडलेल्या तब्बल 475 महिलांनी मंदिराच्या सभामंडपात एकत्र येत अभंगगायनाचा ऐतिहासिक कार्यक्रम सादर केला. सभामंडपाच्या क्षमतेनुसार 19 मंडळांतील महिलांची निवड करण्यात आली होती.
विशेष म्हणजे, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने महिला भगिनींनी एकत्र येऊन मुख्य मंदिर परिसरात अभंगगायन केल्याची घटना अभूतपूर्व मानली जात आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक नव्हे, तर महिला सहभागाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरला.
ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे शिष्य धनंजय जवंजाळ यांच्या प्रयत्नातून मंदिर प्रशासनाची परवानगी मिळाली. त्यानंतर बेळगावच्या महिला भगिनींनी भक्तिरसात न्हाऊन निघालेला तीन तासांचा कार्यक्रम सादर केला.
‘रूपावली’पासून सुरू झालेल्या अभंगगायनात ‘गोड गोड तुझे नाम’, ‘गणेश शारदा’, ‘त्रिशुळावरी काशीपुरी’, ‘काय सांगू आता संतांचे उपकार’ यांसह एकूण 15 अभंग सादर करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या निनादाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.
कार्यक्रमानंतर मंदिर परिसरातील भाविक, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये या सोहळ्याचीच चर्चा रंगली होती. “मुख्य मंदिरात एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांचे अभंगगायन यापूर्वी कधी पाहिले नव्हते,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

या उपक्रमाचे समन्वयक म्हणून मनस्वी एलजी यांनी 19 मंडळांचे प्रतिनिधित्व करत संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. कार्यक्रमाचे निवेदन माधुरी कोल्हटकर यांनी केले, तर शंकर पाटील गुरुजी यांनी सर्वांचे आभार मानले.
बेळगावच्या महिला भगिनींनी विठुरायाच्या चरणी अर्पण केलेला हा स्वरनाद केवळ भक्तीचा नव्हे, तर एकजुटीचा, संस्कारांचा आणि सांस्कृतिक वारशाचा जिवंत दस्तऐवज ठरला आहे. पंढरपूरच्या पवित्र भूमीत घुमलेला हा टाळ-मृदंगाचा गजर आता बेळगावकरांसाठी अभिमानाचा क्षण बनला आहे




