बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात खराब झालेले रस्ते आणि त्यामुळे निर्माण झालेली असुरक्षित परिस्थिती यांबाबत नागरिकांच्या अनेक महिन्यांच्या तक्रारींनंतर बेळगाव महानगरपालिकेने शहराच्या ’24×7′ (चोवीस तास) पाणीपुरवठा प्रकल्पासाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी येणारा खर्च महापालिका नंतर ‘कर्नाटक शहरी पायाभूत सुविधा विकास आणि वित्त महामंडळ’ (केयुआयडीएफसी) आणि त्यांचा कंत्राटदार ‘एल अँड टी कन्स्ट्रक्शन’ यांच्याकडून वसूल करणार आहे.
बेळगाव शहरात 24 तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत भूमिगत जलवाहिन्या टाकण्यासाठी आणि घराघरांपर्यंत नळ जोडणी देण्यासाठी रस्ते खोदण्यात आले होते. मात्र अनेक ठिकाणी खोदकाम बुजवून रस्ते पूर्ववत करण्याचे काम अपूर्ण राहिले आहे. यामुळे रस्त्यांवर खड्डे, असमान पृष्ठभाग आणि धोकादायक पट्टे तयार झाले आहेत.
परिणामी या रस्त्यावरून वाहनचालकांसाठी विशेषतः दुचाकीस्वारांसाठी दररोज प्रवास करणे एक आव्हान बनले आहे. बेळगावमधील अनेक भागांतील रहिवाशांनी रस्त्यांच्या खालावलेल्या स्थितीबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली आहे.
जलवाहिनीचे काम पूर्ण होऊन बराच काळ लोटल्यानंतरही अनेक रस्ते अजूनही एखाद्या बांधकाम क्षेत्रासारखे अव्यवस्थित दिसत आहेत. या परिस्थितीमुळे वारंवार अपघात होत असून वाहतुकीतही अडथळे निर्माण होत आहेत.

सदर समस्येचे एक मुख्य कारण म्हणजे केयुआयडीएफसी, बेळगाव महानगरपालिका आणि बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्यातील समन्वयाचा अभाव होय. अनेक ठिकाणी, ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत नव्याने बांधलेले सिमेंट काँक्रीटचे रस्ते जलवाहिनीच्या कामांसाठी पुन्हा खोदावे लागले;
यावरून नियोजनातील त्रुटींबद्दल नागरिकांनी टीका केली आहे. बेळगावचे आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले की, त्यांनी स्वतः कांही बाधित रस्त्यांची पाहणी केली असता, रस्ते खोदण्याचे आणि त्यानंतर ते पूर्ववत करण्याचे काम विहित मानकांनुसार केले गेले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. महानगरपालिका आणि केयुआयडीएफसीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आमदारांच्या बैठकीनंतर संभाव्य अपघात टाळण्यासाठी खराब झालेले रस्ते त्वरित पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला.




