belgaum

संडे मार्केटच्या वादावर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत तोडगा बैठक

0
Satish jarkiholi
 belgaum

बेळगाव लाईव्ह : एपीएमसी प्रांगणातील संडे मार्केटच्या वादग्रस्त मुद्यावर अखेर जिल्हा प्रशासनाने मध्यस्थी केली असून, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली.

‘जय किसान खाजगी भाजी मार्केट’च्या व्यापाऱ्यांनी उपबाजारपेठ स्थापनेसाठी अधिकृत प्रस्ताव सादर केल्यास राज्य सरकारकडे त्याचा सकारात्मक पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी यावेळी दिली. मात्र, हा प्रस्ताव मंजूर न झाल्यास व्यापाऱ्यांना एपीएमसी संकुलातच गाळे घेणे बंधनकारक राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी व्यापाऱ्यांना पर्यायी व्यवस्थेसाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती, त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या अधिकृत लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन व्यापाऱ्यांनी गाळे मिळवावेत, असे आवाहन सतीश जारकीहोळी यांनी केले.

या बैठकीत खाजगी मार्केटचे प्रतिनिधी अब्दुल करीम भागवान यांनी व्यापाऱ्यांची व्यथा मांडताना, परवाना रद्द झाल्यामुळे शेकडो व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे सांगत हा निर्णय मागे घेण्याची भावनिक साद घातली. यावर बोलताना मंत्र्यांनी स्पष्ट केले की, प्रशासन पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करेल, त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे रीतसर निवेदन सादर करावे जेणेकरून ते पुढील मंजुरीसाठी शासनाकडे पाठवता येईल.

 belgaum

या महत्त्वपूर्ण चर्चेला आमदार आसिफ सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह व्यापारी प्रतिनिधी मोहन मन्नोळकर आणि इक्बाल डोणी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.