बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील येळ्ळूर येथे दहा वर्षांपूर्वी झालेल्या ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक वादातून निष्पाप ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेल्या सर्व सात खटल्यांमध्ये आता निर्दोष मुक्तता झाली आहे. पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारानंतर ग्रामस्थांना नाहक कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या होत्या, ज्याचा निकाल आता मराठी भाषिकांच्या बाजूने लागला आहे.
२७ जुलै २०१४ रोजी महाराष्ट्र राज्य येळ्ळूर असा फलक हटवल्यानंतर पोलीस प्रशासनाने एकूण ७ केसेस दाखल केल्या होत्या. यापूर्वीच्या ५ केसेसमध्ये सर्व आरोपी निर्दोष सुटले होते. उर्वरित २ केसेसचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्येही सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
केस नंबर १२२/२०१५ मध्ये अर्जुन गोरल, रमेश घाडी, नंदू कुगजी, मारुती देसाई, पिंटू धामणेकर, बसवंत लोहार, श्रीकांत नांदुडकर, सागर काकतकर, अमित जाधव, मनोहर कुंडेकर, विठ्ठल कुरंगी, शंकर कणबरकर, परशुराम कंग्राळकर , अनंत कंग्राळकर , शिवाजी जाधव, प्रशांत कुगाजी, अर्जुन चौगुले, प्रशांत टक्केकर, परशुराम धामणेकर, अनंत कुंडेकर, मधु कुगजी, कृष्णा काकतकर, अशोक धामणेकर, तानाजी हलगेकर, मारुती गोरल, चांगप्पा हलगेकर, अरविंद पाटील, नारायण काकतकर, शामला जाधव, सुधा जाधव, मलन जाधव, कमल पोटे, जयश्री खादरवाडकर, रामचंद्र बागेवाडी, विकास पाटील, सुनील पाटील आणि सतीश कुगजी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
याच केसमध्ये प्रवीण धामणेकर हे सतत गैरहजर राहिल्याने त्यांचे नाव केस मधून वगळण्यात आले. यापूर्वी सूरज नायकोजी, सतीश जाधव, नारायण कंग्राळकर, अनंत पाटील, संजय गोरल आणि प्रशांत जाधव या सहा जणांची नावे वगळण्यात आली होती. दुर्दैवाने या प्रदीर्घ लढाईत अरुण यळ्ळूरकर, बाळू मजुकर आणि शिवाजी काकतकर या तिघांचे निधन झाले आहे.

केस नंबर १२६ मध्ये आज १९ आरोपी हजर होते ज्यांचे जबाब नोंदवण्यात आले. यामध्ये अर्जुन गोरल , चांगदेव देसाई, अनंत चिट्ठी, वृशेषन पाटील, संभाजी हट्टीकर , शिवाजी कदम, सुनील धामणेकर, श्रीकांत नांदुडकर, राहुल कुगजी, नागेश बोबटे, सुनील कुंडेकर, रवळू कुगजी, केशव हलगेकर, गणपती पाटील, नामदेव नायकोजी, केशव पाटील, रमेश धामणेकर, रामचंद्र कुगजी आणि सतीश कुगजी यांचा समावेश आहे. या खटल्यातूनही सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
वारंवार गैरहजर राहिल्यामुळे परशुराम कुंडेकर, गणेश पाटील, जयंत पाटील, सातेरी बेळवटकर आणि रामचंद्र बागेवाडी या पाच आरोपींना केस मधून वगळण्यात आले आहे. या प्रकरणाचे काम ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. श्याम पाटील आणि ॲड. हेमराज बेंचन्नवर यांनी पाहिले.
येळ्ळूरच्या जनतेवर एकूण सात खटले दाखल करण्यात आले होते. येळ्ळूरचा मानबिंदू असलेला महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा फलक हटविल्यानंतर पोलिसांनी जनतेला अमानुष मारहाण केली होती आणि त्यांच्यावर वेगवेगळे सात खटले भरले होते. आज या सर्व कायदेशीर लढाईचा शेवट गोड झाला असून मराठी भाषिकांच्या एकजुटीचा विजय झाला आहे.





