belgaum

१५ कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

0
461
cop borase
cop borase
 belgaum

बेळगाव लाईव्ह : आंतरराष्ट्रीय स्तरावर धागेदोरे असलेल्या गुन्ह्यात बेळगावमधील एका वृद्धाची १५ कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे प्रकरण आता सीबीआयकडे वर्ग केले जाणार आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी १ कोटी रुपयांची रक्कम गोठवली असून, एका महिला आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी आज दिली.

वृद्धाच्या बँक खात्यातून तब्बल १५ कोटी रुपये अहमदाबाद, कोलकाता, गुवाहाटी, हरियाणा आणि दिल्ली येथील १० वेगवेगळ्या खात्यांत वळवण्यात आले होते. हैदराबादमध्ये केलेल्या तांत्रिक तपासानुसार, श्रीपाद नायक आणि शरद नायक यांनी एका बनावट कंपनीच्या नावावर ही रक्कम ट्रान्सफर केली होती.

या फरार आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. तपासाचा हा टप्पा १० कोटींच्या पुढील रकमेचा असल्याने सरकारी नियमांनुसार या प्रकरणाची कागदपत्रे सीबीआयकडे सोपवण्यासाठी तयार केली जात आहेत, असे भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले.

 belgaum

दुबईतून म्युल खात्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या या रॅकेटमधील एका महिला आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, दुबईत बसून सूत्रे हलवणाऱ्या मुख्य आरोपीच्या अटकेसाठी हालचाली तीव्र केल्या आहेत. परदेशातून सायबर गुन्हेगार स्थानिक खात्यांचा वापर करून लोकांची लूट करत असल्याचे तपासात समोर आले आहे, अशी माहिती भूषण बोरसे यांनी दिली.

बेळगाव शहरात सध्या २,९०० म्युल खाती सक्रिय असल्याचे सांगत भूषण बोरसे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. पैशांच्या हव्यासापोटी कोणीही आपले बँक खाते दुसऱ्या व्यक्तीला वापरण्यास देऊ नये. सायबर गुन्हेगारीत तुमच्या खात्याचा वापर झाल्यास खातेदारावरही कठोर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा भूषण बोरसे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.