belgaum

टाळ-मृदंगाच्या गजरात कचरा डेपोविरोधात रणशिंग

0
237
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या कचरा डेपोमुळे निर्माण झालेल्या नरकयातनांविरोधात आज तुरमुरी ग्रामस्थांनी बेळगाव शहरात धडक दिली. टाळ-मृदंग वाजवत आणि घोषणाबाजी करत हजारो ग्रामस्थांनी प्रशासनाचा निषेध केला. हा कचरा डेपो त्वरित गावातून हटवून त्याचे अन्यत्र स्थलांतर करावे, या मागणीसाठी काढलेल्या या मोर्चाने प्रशासनाला हादरवून सोडले.

गेल्या दशकभरापासून बेळगाव शहराचा सर्व कचरा तुरमुरी परिसरात टाकला जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे गावात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून, शालेय मुले आणि वृद्धांवर हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. तसेच, कचऱ्यातून वाहणारे दूषित पाणी थेट शेतजमिनीत आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळत असल्याने तुरमुरी परिसरातील शेती आणि आरोग्य दोन्ही उद्ध्वस्त होत असल्याची व्यथा आंदोलकांनी मांडली.

शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला. कचरा डेपोतील घाण पाण्यामुळे अंगाला खाज सुटणे आणि त्वचेचे गंभीर आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. सुपीक जमिनी नापीक होत असून प्रशासनाने जाणीवपूर्वक तुरमुरी गावाचा बळी दिला आहे. जर हा डेपो तातडीने बंद झाला नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास त्यांनी राजीनामा द्यावा, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

 belgaum

आंदोलनाची तीव्रता पाहून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्वतः आंदोलकांशी संवाद साधला. कचरा डेपोसाठी नवीन जागेचा शोध सुरू असून या प्रक्रियेला काही अवधी लागणार आहे. मात्र, तोपर्यंत तुरमुरी येथील डेपोमधील सध्या सुरू असलेले कामकाज तात्काळ प्रभावाने थांबवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आश्वासनानंतर आंदोलकांनी तात्पुरती माघार घेण्याचा निर्णय घेतला.

या ऐतिहासिक आंदोलनात तुरमुरी गावातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. डोक्यावर हंडे घेऊन आणि टाळ वाजवत महिलांनी प्रशासनाचा निषेध केला. जिल्हाधिकाऱ्यांनी कामाला स्थगिती दिल्याने सध्या तुरमुरीमध्ये समाधानाचे वातावरण असले, तरी कायमस्वरूपी तोडगा मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.