बेळगाव लाईव्ह :निपाणी (जि. बेळगाव) तालुक्यातील बेनाळी गावातील गटारी व रस्त्याच्या कामांसह आप्पाचीवाडी येथील कालव्यावरील ब्रिजचे काम तात्काळ हाती घेण्यात यावे अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ व हरित सेनेने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच येत्या दहा दिवसात आमच्या दोन्ही मागण्यांची पूर्तता न झाल्यास निपाणी पाटबंधारे आणि बेनाळी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
कर्नाटक राज्य रयत संघ व हरित सेनेचे राज्य कार्यकारी अध्यक्ष राजू एम. पोवार यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना मागण्यांबद्दल माहिती देऊन सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांनी (डीसी) मागण्यासंदर्भात चौकशी करून ताबडतोब कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्ध प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी सांगितले की निपाणी तालुक्यातील बेनाळी गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून गटारी व रस्त्याचे काम झालेले नाही. येथील जवळच असलेल्या कालव्याच्या साचलेल्या पाण्याचा संपूर्ण गावाला त्रास होत आहे. यासंदर्भात आम्ही वेळोवेळी तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनं सादर केली आहेत.
मागील 2024 मध्ये तहसीलदार आणि तालुका पंचायत सहाय्यक कार्यकारी अधिकारीऱ्यांनी मार्च महिन्यानंतर संबंधित विकास कामे हाती घेतली जातील असे आश्वासन दिले होते त्यानंतर गेल्या जानेवारीमध्ये आम्ही निवेदन देऊन आंदोलन केले होते त्यावेळी पंचायत विकास अधिकाऱ्यांनी मार्चमध्ये गटारी व रस्त्याची विकास कामे केली जातील असे लेखी लिहून दिले होते.
परंतु मागील व यावर्षीचाही मार्च महिना निघून गेला थोडक्यात वर्ष उलटले तरी कोणतेही काम हाती घेण्यात आलेले नाही. यासंदर्भात आता आम्ही निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करून ताबडतोब संबंधित विकासकामे हाती घेण्याचे आदेश दिले आहेत.
आमची दुसरी मागणी निपाणी तालुक्यातील आप्पाचीवाडी येथील कालव्यावर ब्रिज उभारण्यात यावा ही आहे. आप्पाचीवाडी ग्रामपंचायत व्याप्तीत चार गावे येतात आणि या ठिकाणचे श्री हालसिद्धनाथ देवस्थान हे कर्नाटकातील जागृत देवस्थानांपैकी एक आहे. या ठिकाणी दरवर्षी कर्नाटकसह महाराष्ट्र, गोवा, आंध्र व गुजरात राज्यातून लाखो भाविक भेट देत असतात. या ठिकाणी महाराष्ट्रातून एक कालवा आला आहे. या कालव्यावर ब्रिज होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक सरकारच्या आणि आमदारांच्या कारकिर्दीत भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला मात्र फुलाचे बांधकाम मात्र आजपर्यंत झालेले नाही.

या ब्रिजमुळे समस्त शेतकऱ्यांची ऊस वाहतूक, शेतीच्या कामासाठी ये -जा करणे यासाठी, तसेच भक्तांची श्री हालसिद्धनाथ देवस्थानाकडे येण्यासाठी मोठी सोय होणार आहे. दोन्ही बाजूला डांबरी रस्ते असलेल्या या कालव्याच्या ठिकाणी ब्रिज झाल्यास पलीकडे जाण्यासाठीचे 15 -20 कि.मी.चे अंतर वाचणार आहे. या ब्रिजसाठी गेल्या 9 मार्च रोजी आम्ही निपाणी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यावेळी तहसीलदार व पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मार्चनंतर ब्रिज उभारणीचे काम सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले होते.
तथापि आता मार्च महिना उलटला तरी कोणतीही कार्यवाही झालेले नाही. यासंदर्भात विचारणा केली असता प्रत्येक वेळी उडवा उडवीची उत्तरे दिली जातात असे सांगून त्यामुळे आता येत्या 10 दिवसात आमच्या दोन्ही मागण्यांची पूर्तता न झाल्यास निपाणी पाटबंधारे आणि बेनाळी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा आम्ही प्रशासनाला दिला आहे, अशी माहिती राजू पोवार यांनी दिली. याप्रसंगी बेनाळी व आप्पाचीवाडीसह निपाणी भागातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.




