belgaum

बेळगावमध्ये नीट परीक्षेसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू

0
222
 belgaum

बेळगाव लाईव्ह : नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेतली जाणारी ‘नीट’ परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. ३ मे २०२६ रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी शहरातील २७ केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.


नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत नीट परीक्षा ३ मे २०२६ रोजी दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत बेळगावमधील २७ केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा संदर्भ घेत, बेळगाव शहराचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी तथा पोलीस आयुक्त बोरसे भूषण गुलाबराव यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ च्या कलम १६३ नुसार केंद्रांच्या २०० मीटर परिसरात निषाधाज्ञा लागू केली आहे. परीक्षा निष्पक्ष आणि कोणत्याही अडथळ्याविना पार पडावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे भूषण बोरसे  यांनी स्पष्ट केले.


या आदेशानुसार, परीक्षा केंद्रांच्या परिसरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी असेल. केवळ अधिकृत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाच केंद्रात प्रवेश दिला जाईल, तर पालक आणि नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. शस्त्रे, स्फोटके किंवा घातक वस्तू बाळगण्यावर पूर्णपणे बंदी असून, सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी किंवा वाद्य वाजवण्यासही मनाई करण्यात आली आहे.


दरम्यान, एप्रिल २०२६ मध्ये होणाऱ्या डी.एल.एड. प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या पूरक परीक्षांसाठीही स्वतंत्र प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. २७ एप्रिल ते ४ मे २०२६ या कालावधीत मन्नूरमधील जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत ही परीक्षा होणार आहे. या केंद्राच्या परिसरातही २०० मीटर व्याप्तीत निषाधाज्ञा लागू करण्यात आली आहे.


दोन्ही परीक्षांच्या पार्श्वभूमीवर केंद्रांच्या परिसरातील झेरॉक्स दुकाने, सायबर कॅफे आणि इंटरनेट केंद्रे परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ध्वनीवर्धकाचा वापर करण्यासही पूर्णपणे मनाई आहे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम २२३ नुसार कठोर कारवाई करण्याचे अधिकार संबंधित पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.