belgaum

सायबर गुन्हेगारांनी घातला एपीके फाईलद्वारे 5 लाखांचा गंडा

0
198
Cen police station
 belgaum

बेळगांव लाईव्ह :बेळगाव शहरात सायबर गुन्हेगारांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत असून एपीके फाईलच्या माध्यमातून उद्यमबाग येथील सुरेश मुर्वे नावाच्या इसमाला सायबर गुन्हेगारांनी 5 लाख रुपयांना ठकल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

पोलीस प्रशासनाच्या सायबर क्राईम विभागाकडून एपीके फाईलच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकी संबंधी नेहमी जागृती करूनही फसवणुकीचे प्रकार कमी झालेले दिसत नाहीत. गेल्या तीन महिन्यात बेळगाव जिल्ह्यातील 3 व बेळगाव शहरासह तालुक्यातील 3 अशा 6 जणांना एपीके फाईलच्या माध्यमातून ठकविल्यासंबंधी एफआयआर दाखल झाले आहेत.

त्यामध्ये गेल्या गुरुवारी उद्यमबाग येथे घडलेल्या प्रकरणाची भर पडली आहे. याबाबत समजलेले माहिती अशी की, आठवड्याभरापूर्वी उद्यमबाग येथील सुमारे 52 वर्षीय सुरेश मुर्वे या इसमाच्या व्हाट्सअप वर एका राष्ट्रीयकृत बँकेच्या नावे एपीके फाईल आली.

 belgaum
Cen police station

बँकेकडून आपल्याला एखादी कागदपत्रे अथवा सूचना आल्या असाव्यात या कुतूहलापोटी सुरेश यांनी फाईलवर क्लिक करताच त्यांच्या मोबाईलचा ताबा सायबर गुन्हेगारांकडे गेला. त्यानंतर गुन्हेगारांनी टप्प्याटप्प्याने त्यांच्या बँक खात्यातून 5 लाख रुपये हडप केल्याचे उघडकीस आले आहे.

या संदर्भात 1930 पोर्टलवर तक्रार दाखल झाल्यानंतर गुरुवारी बेळगाव शहर सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करून घेण्यात आला. एकंदर आरटीओ चलन, ट्रॅफिक पोलीस, लग्नपत्रिका, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आदींच्या नावे एपीके फाईल तयार करून सावजांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता वेगवेगळ्या बँकांच्या नावेही फसवणूक सुरू केली असल्यामुळे नागरिकांनी सजग राहण्याची गरज पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.