बेळगाव लाईव्ह :बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी घराच्या तिजोरीतील लाखो रुपये किमतीचे तब्बल सुमारे 80 ते 90 तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना काल गुरुवारी दुपारी लक्ष्मी रोड, भारतनगर शहापूर येथे उघडकीस आली.
चोरीचा हा प्रकार लक्ष्मी रोड, भारतनगर येथील 55 वर्षीय कल्पना मुरलीधर काटवा यांच्या बंगल्यामध्ये घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काटवा आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य गेल्या 28 मार्च रोजी बंगल्याला कुलूप लावून एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चार-पाच दिवसांकरिता हुबळी येथे गेले होते. या पद्धतीने घर सतत पूर्णपणे बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजा फोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटे, ड्रॉवर आणि इतर सामानांची उलतापालथ केल्यानंतर चोरट्यांनी तिजोरी फोडून लाखो रुपये किमतीचे अंदाजे 80 ते 90 तोळे सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या. काटवा कुटुंबीय काल गुरुवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घरी परतले असता चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. तेंव्हा त्यांनी लागलीच शहापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली.

घरफोडीच्या या प्रकाराची माहिती मिळताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमनी आणि गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राज अरस यांच्यासह शहापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी चौकशी व पाहणी केल्यानंतर चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ञाना पाचारण करण्यात आले होते. प्राथमिक तपासात चोरट्यांनी घर रिकामी असल्याची खात्री करूनच नियोजनपूर्वक घरफोडी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.





