बेळगाव लाईव्ह : बेळगाव ते हैद्राबाद या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वायव्य कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळाने अत्यंत आधुनिक अशी ‘राजरथ’ वातानुकूलित स्लीपर कोच सेवा सुरू केली आहे.
गुरुवारी संध्याकाळी बेळगाव बसस्थानकावर या नवीन बसचे विधिवत पूजन करून प्रवाशांच्या सेवेत ही बस दाखल झाली. यामुळे सीमाभागातील प्रवाशांना आता थेट आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील हनुमण्णवर यांच्या हस्ते या ‘राजरथ’ बस सेवेचा थाटात शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी बसमधील पहिल्या काही प्रवाशांचे आपुलकीने स्वागत करत त्यांना सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देणारी ही सरकारी वातानुकूलित सेवा प्रवाशांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

वेळापत्रकानुसार, ही बस दररोज सायंकाळी ७.३० वाजता बेळगावमधून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ६.०० वाजता हैद्राबादला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठीही अशाच पद्धतीची सोय करण्यात आली आहे.
सुरक्षित आणि खात्रीशीर प्रवासासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुनील हनुमण्णवर यांनी केले आहे. याप्रसंगी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





